Category: नगर परिषद निवडणूक
written by Chandrakant Maniyar | November 7, 2025

मूल ( मेहुल मनियार )
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार प्रचाराची तयारी जोरात करताना दिसत आहेत.
प्रभागनिहाय मतदारांशी संवाद, घराघरांतील भेटी, आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा अशा उपक्रमांना वेग आला आहे. काही ठिकाणी पक्षांतर्गत चर्चा आणि उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून तरुण आणि नवीन चेहरेही या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.
शहरात पोस्टरबाजी, बॅनर आणि सोशल मीडियावर प्रचार मोहीमेद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने राजकीय हालचालींना आणखी गती येईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कोणाची दावेदारी?
नगराध्यक्ष पदासाठी कोणाची दावेदारी ठरणार, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.काँग्रेस पक्षाकडून तर लगभग उमेदवारी ठरली आहे फक्त अधिकृत घोषणा व्हायची आहे.भारतीय जनता पक्षाकडून कोणत्या नेत्याला उमेदवारी दिली जाणार, याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गाठीभेटी सुरू असून, अनेक जण आपल्या समर्थकांसह प्रचाराची तयारीही सुरू करताना दिसत आहेत. मात्र,अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडेच राहणार असल्याने अधिकृत घोषणा होईपर्यंत सर्वांची नजर उच्च स्तरावरील बैठकींकडे लागली आहे.
दरम्यान, काही नावांची चर्चा जोरात असली तरी पक्षात अद्याप अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कोणाची दावेदारी ठरणार, हे तर आता वेळच सांगेल.