शास्त्रीय शेतीचा संदेश देत पळसगाव (जाट) येथे “कृषी दिन” केला साजरा

  • मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

  •           डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न कृषि महाविद्यालय, मुल च्या बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रातील ग्रामीण कृषी कार्यानुभव (Rural Agricultural Work Experience) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.  शेतकऱ्याचा बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना डॉ. शरद गडाख, मा. कुलगुरू, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला यांनी केल्यानुसार कृषि महाविद्यालय, मुल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्हि. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा पळसगाव (जाट) येथे  हा कार्यक्रम राबविण्यात आला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पळसगाव (जाट) येथील प्रगतिशील शेतकरी श्री. किशोर हटवादे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत पळसगाव जाट चे ग्रामविकास अधिकारी बलराम मेश्राम. आसाराम बकर, प्रगतिशील शेतकरी तसेच श्री. सुयोग गावडे, कृषी सहाय्यक उपस्थित होते. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील श्री. प्रवीण देशपांडे (कृषि किटकशास्त्र) व श्री. ज्ञानेश्वर ताथोड (कृषि अभियांत्रिकी) तसेच कृषि महाविद्यालय, मुल येथील सहाय्यक प्राध्यापक (कृषी विद्या  )डॉ. स्वप्नील ठाकरे, आणि  सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोग शास्त्र डॉ. गितांशु टी. डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) हे विषयतज्ज्ञ म्हणून उपस्थित होते.

  • कार्यक्रमाची सुरुवात भाऊसाहेब देशमुख आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलन व करण्यात आली. त्यानंतर कु. स्वाक्षरी खोब्रागडे हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कृषी दिनाचे महत्त्व, भारताचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनामागील उद्देश स्पष्ट केला. कु. पल्लवी उरकुडे हिनी कृषी दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, आधुनिक शेतीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत शेतीची गरज याविषयी आपले विचार मांडले. त्यांनी कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान स्वीकारून उत्पादनवाढीसोबतच खर्च कमी करण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनतर कु. श्रद्धा वालोदे हिने शेतकऱ्यांच्या कष्टांचे महत्त्व अधोरेखित करताना कृषी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगितले. सेंद्रिय शेती व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

    डॉ. स्वप्नील ठाकरे, सहाय्यक प्राध्यापक (कृषीशास्त्र) यांनी मार्गदर्शन करताना खरीप हंगामातील पीक नियोजन, संतुलित खत व्यवस्थापन, मृदा आरोग्य संवर्धन, जलव्यवस्थापन, हवामानानुसार शेती नियोजन आणि उत्पादनवाढीसाठी वैज्ञानिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी शेतकऱ्यांनी मृदा परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर करावा व आधुनिक कृषी तंत्रज्ञान स्वीकारावे, असे आवाहन केले. डॉ. गितांशु टी. डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) यांनी खरीप पिकांवरील प्रमुख रोग, त्यांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, बीजप्रक्रिया, रोग व्यवस्थापन तसेच एकात्मिक पीक संरक्षण तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांनी रोगांचे वेळेवर निदान करून शास्त्रीय पद्धतीने नियंत्रण करावे, असे सांगितले. श्री. सुयोग गावडे, कृषी सहाय्यक यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पीक प्रात्यक्षिके, मृदा परीक्षण, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण तसेच शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी विभागाशी संपर्क ठेवण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.

  • अध्यक्षीय मनोगतात  किशोर हटवादे यांनी आपल्या प्रगत शेतीतील अनुभव विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमोर मांडले. आधुनिक शेती पद्धती, पीक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, दर्जेदार बियाण्यांचा वापर आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेती अधिक फायदेशीर करता येते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे ही अत्यंत उपयुक्त बाब असल्याचे नमूद केले.

    कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. मोनाली हत्तीमारे हिने केले. तिने उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत संपूर्ण कार्यक्रमाची सांगड अतिशय सुंदरपणे घातली. कार्यक्रमाच्या शेवटी कु. भाग्यश्री घागी यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शेतकरी, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, ग्रामपंचायत, यजमान शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. RAWE च्या विद्यार्थीनिनी हे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यात मोलाचे हातभार लावले. या कार्यक्रमास परिसरातील ३० शेतकरी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी दोन यजमान शेतकऱ्यांच्या शेतावर विषयतज्ज्ञ आणि RAWE विद्यार्थ्यांच्या हस्ते आंबा वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संरक्षणाबरोबरच फळबाग लागवडीचे महत्त्वही शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.

    संपूर्ण कार्यक्रमामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि कृषी तज्ज्ञ यांच्यात ज्ञानाची प्रभावी देवाणघेवाण झाली असून आधुनिक, शाश्वत आणि वैज्ञानिक शेतीचा संदेश ग्रामीण भागात पोहोचविण्याचा उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाला.