Category: समस्या
written by Mehul maniyar | July 13, 2026
नगर परिषद प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; सिमेंट रस्ता आणि नाल्यांच्या निकृष्ट दर्जामुळे प्लॉट घेणार्यांचे भविष्य धोक्यात
मूल
मूल शहराचा विस्तार वेगाने होत असताना, दुसरीकडे मात्र भूस्वामी आणि कंत्राटदारांकडून सर्वसामान्य नागरिकांची उघडउघड फसवणूक सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मूल येथील ताडाळा रोडवर सध्या एका नवीन ले-आऊटच्या विकासाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामात तांत्रिक नियमांना पूर्णपणे केराची टोपली दाखवली जात असून, रस्ते आणि नाल्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने भविष्यात येथे राहण्यास येणाऱ्या नागरिकांचे कंबरडे मोडणार हे आता स्पष्ट झाले आहे.
ले-आऊटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या सीसी रोडच्या संदर्भात गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. सिमेंट रस्ता तयार करण्यापूर्वी खाली जो पाया टाकला जातो, त्यावर नियमानुसार योग्य प्रमाणात दर्जेदार साहित्य वापरणे, पाणी मारणे आणि रोलर किंवा डंपरच्या साहाय्याने दाब देणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, कंत्राटदाराने या दोन्ही महत्त्वाच्या प्रक्रियांना फाटा दिला आहे. पायाच भुसभुशीत राहिल्यामुळे हा सिमेंट रस्ता काही महिन्यांतच खचून त्याला मोठमोठे तडे जाणे आणि रस्ता उद्ध्वस्त होणे अटळ आहे.
रस्त्यापेक्षाही वाईट अवस्था येथील सांडपाण्याच्या नाल्यांची झाली आहे. नाल्यांच्या बांधकामात वापरले जाणारे साहित्य इतके निकृष्ट दर्जाचे आहे की, ‘चोऱ्या-माऱ्या करून उभे केलेले बांधकाम’ अशीच त्याची ख्याती झाली आहे. एखादी छोटीशी ठोकर लागली किंवा वाहनाचा धक्का लागला, तरी ही ड्रेनेज लाईन पत्त्यासारखी कोसळेल, अशी भीषण परिस्थिती आहे.
सर्वात मोठी आश्चर्याची आणि संतापजनक बाब म्हणजे, या नाल्यांचे पाणी पुढे कुठे वाहून नेणार, याचा कोणताही विचार कंत्राटदाराने केलेला नाही. या नाल्या अर्ध्यावरच आणून उघड्या सोडण्यात आल्या आहेत, ज्यामुळे भविष्यात येथे सांडपाणी साचून डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत.
“स्वतःचे हक्काचे घर असावे,” या सुंदर स्वप्नापोटी हजारो कष्टकरी, नोकरदार नागरिक आपल्या आयुष्याची पुंजी जमा करून किंवा बँकेकडून कर्ज काढून या ले-आऊटमध्ये प्लॉट खरेदी करणार. घराचे स्वप्न डोळ्यात साठवून ठेवलेल्या या निष्पाप नागरिकांची कंत्राटदार आणि ले-आऊट मालकाकडून फसवणूक सुरू आहे. जेव्हा नागरिक येथे घरे बांधून राहतील, तेव्हा त्यांना तुटलेले रस्ते आणि तुंबलेल्या नाल्यांचा सामना करावा लागेल, ज्यामुळे त्यांचे स्वप्न चक्काचूर होणार आहे.
या संपूर्ण निकृष्ट दर्जाच्या कामावर *मूल नगर परिषद प्रशासनाचे* नियंत्रण असणे आवश्यक होते. मात्र, नगर परिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी या ले-आऊटमधील बेकायदेशीर आणि तांत्रिक त्रुटी असलेल्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या अंधेपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कंत्राटदार, ले-आऊट मालक आणि नगर परिषद अधिकाऱ्यांचे काही साटंलोटं तर नाही ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून तडाळा रोडवरील या ले-आऊटच्या कामाची तांत्रिक तपासणी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा संतप्त नागरिकांकडून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला जात आहे.