Category: गणेश उत्सव
written by Chandrakant Maniyar | September 20, 2026

मुल: ( प्रा. चंद्रकांत मनियार )
मूल येथील कृषी महाविद्यालयात बाप्पाच्या आगमनाने व विविध धार्मिक कार्यक्रमांनी गणेशोत्सवाचे वातावरण अत्यंत मंगलमय झाले होते. महाविद्यालय परिसरात सलग ५ दिवस चाललेला हा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तीत संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या प्रांगणात लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती, व संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. या ५ दिवसांच्या काळात भजन व इतर उपक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

विशेष आकर्षण
या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मोनाली हत्तीमारे आणि विद्यार्थी प्रज्वल खडसे यांनी रांगोळीच्या माध्यमातून गणपती बाप्पाचे रूप अत्यंत हुबेहूब आणि रेखीवपणे रेखाटले होते, रांगोळीत वापरण्यात आलेली विविध आकर्षक रंगसंगती मुळे रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या सुंदर कलेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतकरे, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी कौतुक केले. या कलाकृतीने गणेशोत्सवाच्या आनंदात आणखीनच भर घातली होती.
दररोज सकाळी व सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते. या उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली.
पाचव्या दिवशी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता करण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात आणि वाजत-गाजत विद्यार्थ्यांनी बाप्पाला निरोप दिला. या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे आणि इतर प्राध्यापक वर्ग यांनी सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.