निरोगी आरोग्यासाठी योग्य वेळीच तपासणी करा: प्राचार्य डॉ. अनिता वाळके

कर्मवीर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

मूल (मेहुल मनियार )

   शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, मूल , राष्ट्रीय सेवा योजना+2 आणि उपजिल्हा रुग्णालय, मूल यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ महाविद्यालयातील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
​या शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या. अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की ,”निरोगी आरोग्यासाठी योग्य वेळीच आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरुण पिढी ही देशाची भावी शक्ती असून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. अनेक आजारांची लक्षणे सुरुवातीच्या काळात सहज लक्षात येत नाहीत, त्यामुळे वेळोवेळी तपासणी करून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.”
​या शिबिरात उपजिल्हा रुग्णालय मूल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तीरथ उराडे यांनी विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली, तसेच निरोगी राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व आरोग्यविषयक मोलाची माहिती दिली. या तपासणी शिबिरातून “निरोगी युवा, सक्षम समाज आणि सुदृढ राष्ट्र” हा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.
​या प्रसंगी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर , राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल बोधे, परिचारिका आशा निखाडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन प्रा. निखिल दहिवले यांनी केले.