Category: आरोग्य शिबीर
written by Chandrakant Maniyar | August 12, 2026

कर्मवीर महाविद्यालयात जागतिक युवा दिनानिमित्त सिकलसेल व थायलोसिनिया तपासणी शिबिर
मूल ( मेहुल मनियार )
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित व शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे जागतिक युवा दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि लोककल्याण डायग्नोसिस यांच्या संयुक्त विद्यमाने सिकलसेल व थायलोसिनिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. “ निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी योग्य वेळीच आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे ,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
तरुण पिढी ही देशाची भावी शक्ती असून, विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अनेक आजारांची लक्षणे सुरुवातीच्या काळात सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी आवश्यक आरोग्य तपासणी करून घेणे आणि आरोग्यविषयक योग्य माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे विचार व्यक्त केले. सिकलसेल आणि थायलोसिनिया या रक्ताशी संबंधित आजारांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, तपासणीचे महत्त्व समजावे आणि आरोग्याबाबत प्रतिबंधात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. लोककल्याण डायग्नोसिसच्या पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक माहिती व मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तपासणीचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी शिबिराला चांगला प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच सिकलसेल व थायलोसिनिया बाबत विविध प्रश्न विचारून आवश्यक माहिती जाणून घेतली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा .बनकर, लोककल्याण डायग्नोसिसचे पथक, राष्ट्रीय सेवा कार्यक्रमाधिकारी प्रा. राहुल बोधे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरातून “ निरोगी युवा , सक्षम समाज आणि सुदृढ राष्ट्र ” हा आरोग्यविषयक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात आला.