मूल शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपाचा नगर परिषद कार्यालयावर घागर मोर्चा

 

मूल ( मेहुल मनियार )

       मूल नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज रामलीला भवन पासून नगर परिषद कार्यालयावर घागर मोर्चा काढून मुख्याधिकारी संदीप दोडे यांना निवेदन सादर करण्यात आले. मुख्याधिकारी यांनी यावेळी सांगितले की पाण्याची समस्या लवकर सोडविण्यासाठी नगर प्रशासनाद्वारे प्रयत्न केला जाईल.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पिण्याचे पाणी, घरगुती वापराचे पाणी तसेच दैनंदिन जीवनावश्यक गरजांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे.

भाजपाच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली की, मूल शहरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा, सर्व प्रभागांमध्ये नियमित वेळापत्रकानुसार पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची कारणे नागरिकांसमोर स्पष्ट करण्यात यावीत तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. ज्या भागात पाणीटंचाई तीव्र आहे, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात आला नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

        भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले यांच्या नेतृवात निघालेल्या या घागर मोर्चात  भाजपा शहर अध्यक्ष प्रविण मोहुर्ले,अनुसूचित जाती अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,जिल्हा युवा मोर्चा महामंत्री राकेश ठाकरे ,महिला कार्यक्रम प्रमुख किरण कापगते, ओबीसी महामंत्री शिवानी आगडे,नगर सेविका प्राची आक्केवार,नगर सेविका अश्विनी निकोडे, जिल्हा सदस्य नंदकिशोर रणदीवे माजी नगराध्यक्ष उषा शेंडे,सहकार आघाडी अजय गोगुलवार,उद्योग आघाडी जिवन कोन्तमवार महामंत्री जितेंद्र टिंगुसले, प्रशांत बोबाटे,जिल्हा पदवीधर प्रमुख युवराज चावरे,युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे,महिला आघाडी अध्यक्ष मनिषा गानलेवार, किशोर कापगते तसेच  भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.