मूल शहरात ‘श्री गुरु तेग बहादूर साहिब’ यांच्या ३५० वी शहिदी स्मृती रथाचे भव्य स्वागत

मूल

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे शूरवीर ‘श्री गुरु तेग बहादूर साहिब‘ यांच्या ३५० वी शहिदीचे स्मरण जागवत,शहिदी स्मृती रथ आज मूल शहरात दाखल झाला. या ऐतिहासिक रथाच्या आगमनामुळे शहरात श्रद्धा, उत्साह व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील प्रमुख चौकात पारंपरिक पद्धतीने रथाचे स्वागत करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने सिंधी,पंजाबी आणि शिख समाजबांधव, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सर्वांनी शहिदांना अभिवादन करून त्यांच्या बलिदानाला मानवंदना दिली.

या रथाच्या माध्यमातून समाजातील ऐतिहासिक परंपरा, शौर्यगाथा आणि बलिदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. रथावर लावलेल्या माहितीफलकांमधून समाजातील या थोर व्यक्तिमत्त्वांचे जीवनचरित्र व त्यागाची गाथा प्रदर्शित करण्यात आली आहे.

मूल शहरातून मार्गक्रमण करत असताना रथ पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. अनेक ठिकाणी नागरिकांनी रथासमोर नतमस्तक होऊन श्रद्धेने दर्शन घेतले. या उपक्रमामुळे नव्या पिढीमध्ये इतिहासाची जाणीव आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.

या स्मृती रथाच्या आगमनामुळे मूल शहरात भक्तीमय व प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.