कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

मूल, ( मेहुल मनियार)

      कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या उद्देशाने संपूर्ण शरीर आरोग्य तपासणी व पंचकर्म आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास मासमो केअर मल्टी स्पेशालिटी चिकित्सालय व श्रीनिवासा होमिओ क्लिनिक, नागपूर येथील तज्ज्ञ वैद्यकीय चमूने मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. मनोज झाडे, डॉ. विजय वासनिक व डॉ. माधुरी नकाडे यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञांची टीम उपस्थित होती.
शिबिरामध्ये प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण शरीर तपासणी, आरोग्यविषयक सल्ला, वजन व बीएमआय तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर तसेच विविध आजारांबाबत प्राथमिक निदान व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आयुर्वेदातील पंचकर्म उपचारपद्धतीचे महत्त्व, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या शिबिरामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रत्येकाला वैयक्तिक आरोग्य सल्ला देत संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, “शिक्षक व कर्मचारी निरोगी असतील तरच ते विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे महाविद्यालय विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे विविध उपक्रम सातत्याने राबवत राहील,” असे प्रतिपादन केले.
या आरोग्य शिबिरामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्याची संधी मिळाली. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करून भविष्यातही अशा आरोग्यविषयक शिबिरांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.