कर्मवीर महाविद्यालय, मूल द्वारा बोरचांदली येथे आयोजित रा.से.यो. विशेष वार्षिक शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात

मूल : ( मेहुल मनियार )

  शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न कर्मवीर महाविद्यालय, मूल येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “Youth for My Bharat” व “Youth for Digital Literacy” या संकल्पनांवर आधारित बोरचांदली येथे आयोजित विशेष वार्षिक शिबिराचा समारोप दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


नवभारत विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. शुभांगी अनिलजी वैरागडे  सदस्य शिक्षण प्रसारक मंडळ, मूल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोर चांदली येथील सरपंच, सौ. ललिताताई सेमस्कार, लोकमत समाचार चे तालुका प्रतिनिधी प्रा. चंद्रकांत मणियार, मुख्याध्यापक मारुती जिल्हेवार, पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर यांची उपस्थिती होती. तसेच पोरेड्डीवार , वर्भे , पेंदोर शिक्षिकासह, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण उपरे व सह कार्यक्रम अधिकारी डॉ. केवल कऱ्हाडे हे मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण उपरे यांनी केले. त्यांनी सात दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या ग्रामस्वच्छता, श्रमसंस्कार, डिजिटल साक्षरता, आरोग्यविषयक उपक्रम, बौद्धिक सत्रे व सांस्कृतिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती देत स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय भाषणात सौ. शुभांगीताई अनिलजी वैरागडे यांनी ग्रामीण भागातील शिक्षणविकासासाठी केलेल्या योगदानाचा थोडक्यात आढावा घेतला. रा.से.यो.सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक जाणीव व नेतृत्वगुण विकसित होतात, तसेच अशा शिबिरांतून चारित्र्यसंपन्न व जबाबदार नागरिक घडतात, असे त्यांनी प्रतिपादन केले.
प्रमुख अतिथी प्रा. चंद्रकांत मणियार यांनी आपल्या भाषणात रा.से.यो.च्या माध्यमातून घडणारी समाजाभिमुख चळवळ ही ग्रामीण विकासाची खरी शक्ती असल्याचे नमूद केले. स्वयंसेवकांनी समाजातील प्रश्न संवेदनशीलतेने मांडून सकारात्मक बदल घडविण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी मार्गदर्शनपर भाषणात रा.से.यो. शिबिरामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण वास्तवाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो व त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते, असे सांगितले. अशा उपक्रमांतून घडलेले विद्यार्थी उद्याचे सक्षम व सजग नागरिक ठरतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मार्गदर्शनपर भाषणात. मारुती जिल्हेवार यांनी शाळा–महाविद्यालय व ग्रामसमाज यांच्यातील समन्वय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. रा.से.यो.च्या माध्यमातून शिक्षणासोबत समाजसेवेलाही तितकेच महत्त्व द्यावे, असे त्यांनी नमूद केले. प्रा. दिनेश बनकर यांनी श्रमसंस्कार, संघभावना व शिस्त या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून समाज सक्षम करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
२९ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या सात दिवसीय विशेष शिबिरात ग्रामस्वच्छता उपक्रम, उमा नदीवर बंधारा बांधणे, सामाजिक समस्यांवर आधारित पथनाट्य, प्रभात फेरी तसेच विविध बौद्धिक सत्रे यशस्वीरीत्या राबविण्यात आली.
बौद्धिक सत्रांत सौ. लता पारेलवार व डॉ. रमेश पारेलवार (युवक समस्या समुपदेशक) यांनी “डिजिटल युगातील युवक आणि ध्यानसाधना” या विषयावर मार्गदर्शन केले. “सायबर जागरूकतेमधून ग्रामोन्नती” या विषयावर प्रा. अनिल डहाके (भ.भा.च. कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर) यांनी सखोल मार्गदर्शन केले. श्रीमती मीना नंदनवार (ICTC) यांनी महिला सशक्तीकरणाविषयी माहिती दिली, तर शाश्वत शेती, जलसंवर्धन व ग्रामविकास या विषयांवर श्री. संजय कुंटावार (माजी सरपंच, बोरचांदली) व श्री. महेशभाऊ कटकमवार (सदस्य, ग्रामपंचायत बोरचांदली) यांनी अनुभवाधारित विचार मांडले. शिबिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लोमेश देशमुख यांनी केले, तर प्रा. समीर अलूरवार यांनी आभार प्रदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमास ग्रामस्थ, शिक्षकवृंद व रा.से.यो. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.