Category: क्रांति दिवस
written by Chandrakant Maniyar | August 10, 2026

मूल ( मेहुल मनियार )
शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या. यावेळी डॉ. केवळ कऱ्हाडे, प्रा. भूषण वैद्य, प्रा. लोमेश देशमुख, प्रा. डॉ. उज्वला कापगते, प्रा. गजानन घुमडे, डॉ. प्रवीण उपरे, डॉ. गणेश गायकवाड तसेच डॉ. जी. एस. आगलावे यांनी क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनाचे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना वक्त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान, स्वातंत्र्याच्या चळवळीतील जनसामान्यांचा सहभाग तसेच आदिवासी समाजाचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यावर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला, भाषा आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते जपण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या इतिहासाची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानिक मूल्ये जोपासावीत, असे आवाहन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन देशाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले. आदिवासी समाजाच्या कला, संस्कृती व परंपरांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनाबद्दल आपली कृतज्ञता व सामाजिक बांधिलकी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि आदिवासी संस्कृतीविषयी आदर निर्माण होण्यास प्रेरणा मिळाली.