Category: Uncategorized
written by Chandrakant Maniyar | March 25, 2026

कर्मवीर महाविद्यालय मूल येथे जागतिक ग्राहक दिन साजरा
मुल – ( मेहुल मनियार )
शिक्षण प्रसारक मंडल मूल द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मूल व जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर महाविद्यालय मुल येथे जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रम सुरूवात झाली. त्यानंतर विद्यार्थिनीनी जागतिक ग्राहक दिनाचे गीत सादर केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ॲड.अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मुल व प्रमुख अतिथी म्हणून श्री दिलीप फडके संस्थापक अध्यक्ष तथा राज्य संघटक जागरूक ग्राहक राजा महाराष्ट्र राज्य, प्राचार्या डॉ.अनिता वाळके, कृषी महाविद्यालय मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे व दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा विदर्भ प्रांत, रमेश डांगरे व पर्यवेक्षक प्रा.दिनेश बनकर हे उपस्थित होते.ऍड. अनिल वैरागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्वांना जागतिक ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपले मत व्यक्त करतांना म्हणाले ,ग्राहक म्हणून आपण सतर्क राहण्याची आज गरज आहे .गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि सेवा मिळविण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले . प्रमुख अतिथी म्हणून श्री. दिलीप फडके यांनी आपल्या मनोगतात ग्राहक संरक्षणाचे विविध उदाहरणे देऊन ग्राहक सेवा आपल्या जीवनात किती उपयोगी आहे आणि फसवणूक झाल्यास कशाप्रकारे तक्रार करावी असे विविध उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना जागृत केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागृतीबाबत सकारात्मक विचारधारा निर्माण झाली पाहिजे, असे सांगितले.

जागतिक ग्राहक हक्क दिन हा केवळ एक दिवस नाही, तर ती एक चळवळ आहे,जी ग्राहकांच्या अधिकारांसाठी लढते. दीपक देशपांडे यांनी ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे.ग्राहकामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेत मध्यवर्ती स्थान आहे. ग्राहकाला त्याची मूलभूत हक्क मिळालेच पाहिजे.वस्तू घेताना बिल जरूर घ्यावे,गुणवत्तेची खात्री नेहमी करावे, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रमेश डांगरे यांनी केले. व संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. निरज चन्ने यांनी केले तर कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली.