मुल येथील कु. मृणाली बल्लेवार हिने दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत पटकवीला पुरस्कार

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

राजीव गांधी स्टडी सर्कल (RGSC) आणि राजीव गांधी फाउंडेशन (RGF) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरा भरा स्वराज – Rise & Act’ या विषयावर राष्ट्रीय केस स्टडी स्पर्धेचे आयोजन जवाहर भवन, नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मुल येथील गोपाल बल्लेवार यांची सुकन्या कु. मृणाली गोपाल बल्लेवार हिला तृतीय उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातून 147 केस स्टडी सादर केलेल्या विद्यार्थ्यांमधून  निवड झालेल्या 30 विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि सार्वजनिक धोरणांशी संबंधित विषयांवर आपले केस स्टडी जवाहर भवन, नवी दिल्ली येथे दिनांक 20/08/2026 ला सादर केले होते.
मृणाली बल्लेवार हिने “Addressing Industrial Air Pollution in Chandrapur: An Empirical Case Study of Emission Sources, Local Perceptions and Evidence-Based Recommendations” या विषयावर आपला अभ्यास सादर केला. या अभ्यासामध्ये चंद्रपूरमधील औद्योगिक वायुप्रदूषणाचे स्रोत, स्थानिक नागरिकांच्या समस्या व धारणा तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या पुराव्यावर आधारित उपाययोजनांचा अभ्यास करण्यात आला.

कु. मृणाली बल्लेवार चंद्रपूर येथील महाविद्यालयात कायदा शाखेत शिक्षण घेत असल्याने ( B. A. LLB चौथ्या वर्षात) पर्यावरणीय कायदे, पर्यावरणीय प्रशासन आणि प्रत्यक्ष पातळीवरील अंमलबजावणी यांचा परस्परसंबंध या दृष्टिकोनातून विषय मांडला. राष्ट्रीय स्तरावरील निवडक स्पर्धकांमध्ये स्थान मिळवत तीला तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
दिल्ली येथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान श्री.राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले, त्यांची भेट घेण्याची आणि त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची संधी मला मिळाली, असे मृणालीने बोलून दाखविले. पुरस्कार वितरणावेळी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.