Category: नगर परिषद निवडणूक 2025
written by Mehul maniyar | November 16, 2025
मूल
नगरपरिषद निवडणूक 2025 साठी फॉर्म भरण्याचा उद्या अंतिम दिवस असताना, प्रभाग क्रमांक 9 मधुन शहरातील सक्रीय आणि निर्भीड पत्रकार म्हणून ओळख असलेले सतीश आकुलवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शहरात ठोस बदल घडवण्याची दृष्टी, सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेण्याची संवेदनशीलता आणि न्याय मिळवून देण्याची निस्वार्थ भावना—या सर्वांचा संगम त्यांच्या उमेदवारीत दिसून येतो. पत्रकारितेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा करत, अनेक मुद्द्यांवर आवाज उठवणारे आकुलवार आता प्रत्यक्ष जनप्रतिनिधी म्हणून काम करण्यास सज्ज झाले आहेत.
“शहर बदलायचे असेल तर व्यवस्थेत उतरून काम करणे गरजेचे आहे,” या विचारातून घेतलेले त्यांचे हे पाऊल शहरात नवी आशा आणि सकारात्मकतेची हवा निर्माण करणारे ठरत आहे. जनतेच्या बाजूने उभे राहणाऱ्या व्यक्तीची निवडणूक रिंगणात एन्ट्री झाल्याने प्रभाग 9 मध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत, “न्यायासाठी सातत्याने आवाज उठवणारी व्यक्ती आता आमच्यासाठी काम करणार ही समाधानाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रभाग 9 मधील निवडणूक अधिक रंजक होत असून, या उमेदवारीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.