कृषि सप्ताहनिमित्य दुसऱ्या दिवशी कृषि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

मुल ( मेहुल मनियार )

         कृषि सप्ताहाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे मा. कुलगुरू डॉ. शरदराव गडाख,  यांनी केल्यानुसार कृषि महाविद्यालय, मुल यांच्या वतीने मुल तालुक्यातील  भेजगाव येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जुलै रोजी कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेंडी व वांगा पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि महाविद्यालयाचे डॉ. रमाकांत गजभिये, प्राध्यापक, (उद्यानविद्या), डॉ. गीतांशु डिंकवार, (वनस्पती रोगशास्त्र), डॉ. प्रवीण घुबे, (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), श्री. देवानंद कुसुंबे, (कृषिविद्या) आणि श्री. अजय उईके (कृषि विस्तार शिक्षण) यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. बदललेल्या हवामानात भेंडी व वांगा पिकांवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच शेंडा व फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नियमित पीक निरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करून रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. सुरक्षित पीक संरक्षणासाठी चिकट सापळे, फेरोमोन सापळे आणि जैविक निविष्ठांचा वापर प्रभावी ठरत असल्याचे सांगण्यात आले.
मार्गदर्शनादरम्यान पिवळे व निळे चिकट सापळे योग्य उंचीवर बसवून रसशोषक किडींचे निरीक्षण व नियंत्रण कसे करावे असे सांगितले. तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापर बीजप्रक्रिया, रोपांची मुळप्रक्रिया आणि जमिनीत शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुळांचे संरक्षण, जोमदार वाढ आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते, असे कृषि तज्ज्ञांनी सांगितले. कीड नियंत्रणासाठी सुरुवातीच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला. निंबोळी अर्कामुळे रसशोषक किडींची संख्या कमी होण्यास मदत होते तसेच पर्यावरण आणि मित्र कीटकांचे संरक्षण होते. शिफारस केलेल्या मात्रेतच जैविक व रासायनिक उपायांचा वापर करावा, फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी तसेच संरक्षणात्मक साधनांचा वापर करावा, असेही सांगण्यात आले.
यावेळी पीक पोषण व्यवस्थापन, तण नियंत्रण, पाण्याचे योग्य नियोजन, शेतातील स्वच्छता, रोगग्रस्त फांद्या व फळे नष्ट करणे आणि संतुलित खत व्यवस्थापनाबाबतही माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी नियमित शेतभेट, पीक निरीक्षण आणि कृषि विद्यापिठाच्या शिफारशींचे पालन केल्यास उत्पादनात वाढ होऊन उत्पादनाचा दर्जाही सुधारेल, असा विश्वास कृषि तज्ज्ञांनी व्यक्त केला. मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून त्यांचे समाधान करून घेतले तसेच बांधावर मिळालेल्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा लाभ भविष्यातील पीक व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना व्यक्त केली. उपस्थितांचे आभार कृषि विस्तार, शिक्षण विभाग चे श्री. अजय उईके यांनी मानले.