Category: साफ सफाई
written by Chandrakant Maniyar | September 4, 2026
समस्या न सुटल्यास भाजपा नगर परिषदेवर ‘कचरा फेको’ आंदोलन करणार
मूल
मूल नगर परिषदेमध्ये कार्यरत सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरअध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी केली आहे. सफाई कामगार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असताना त्यांच्या मूलभूत समस्या प्रलंबित ठेवणे ही गंभीर बाब असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
सफाई कामगारांना वेळेवर वेतन, आवश्यक सुरक्षा साधने, गणवेश, हातमोजे, मास्क, बूट तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच कामगारांच्या सेवेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सफाई कामगारांच्या सर्व समस्या सोडवाव्यात. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ नगर परिषदेवर ‘कचरा फेको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी दिला आहे.
शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांना न्याय मिळेपर्यंत भाजपा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असून प्रशासनाने आंदोलनाची वेळ येऊ न देता तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.