महात्मा गांधी जयंती निमित्य कर्मवीर महाविद्यालय मूल येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

मूल  ( मेहुल मनियार )

        शिक्षण प्रसारक मंडळ, मूल संचालित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा (17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026) च्या समारोपानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकदिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिराची सुरुवात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
श्रमसंस्कार शिबिराच्या अनुषंगाने NSS स्वयंसेवक, NCC कॅडेट्स तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून स्वच्छता कार्याचे नियोजन करण्यात आले. नियोजनानुसार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत संपूर्ण महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. परिसरातील कचरा संकलन, स्वच्छता आणि परिसर सुशोभीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले. स्वच्छता ही केवळ एखाद्या अभियानापुरती मर्यादित न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांना आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, शिस्त व राष्ट्रसेवेच्या मूल्यांना विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणातून पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वच्छतेची जाणीव, सामाजिक बांधिलकी, स्वयंशिस्त आणि सामूहिक कार्यभावना विकसित होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण उपरे, डॉ. केवल कऱ्हाडे, प्रा. अनिल शेलेकर, प्रा. राहुल बोधे, NCC अधिकारी डॉ.उज्वला कापगते, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संदीप मांडवगडे, पर्यवेक्षक प्रा दिनेश बनकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी,NSS स्वयंसेवक, NCC कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.