सोशल मीडियाचा सावधानी पूर्वक उपयोग करावा….. प्रा. चंद्रकांत मनियार यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

मुल ( मेहुल मनियार )

सद्य परिस्थितीत सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे अल्पवयीन युवक आणि युवती बळी पडत असल्याच्या घटना वाढत असल्यामुळे, आजच्या या परिस्थितीत युवक, युवतीनीं सोशल मीडियाचा वापर सांभाळून करावा असे आव्हान प्रा. चंद्रकांत मणियार यांनी कर्मवीर महाविद्यालयाच्या विशेष कार्यक्रम प्रसंगी केले.
लैगिक शिक्षण, बाल विवाह कायदा, पोक्सो कायदा याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रा. चंद्रकांत मनियार प्रमुख मार्गदर्शक होते.प्रा. दिनेश बनकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचा हेतू समजावून सांगताना सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. प्रा. मनियार यांनी आपल्या भाषणातून नुकतेच घडलेल्या एका प्रकरणाबाबत उल्लेख करून अल्पवयीन मुला-मुलींनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता मोबाईलचा वापर आवश्यक आणि योग्य प्रकारे करावा असे म्हटले. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे उद्भवलेल्या प्रकरणातून जीवन उद्ध्वस्त होते त्यामुळे आपण पूर्णतः काळजी घ्यावी, असे सांगितले. आजच्या युवक पिढीने चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे समजून आपले पाऊल उचलले पाहिजे व आपल्या आई-वडिलांचा सन्मान राखण्यासाठी कुठलेही चुकीचे कृत्य होणार नाही याची काळजी करावी असे सांगीतले. योग्य वयात योग्य लैंगिक शिक्षणाचे महत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले. पोक्सो व बाल विवाह कायद्याबाबत सुद्धा सांगितले.


डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आजच्या युवकांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे आणि आपली प्रगती करावी हे सांगताना मोबाईल चा वापर आवश्यक असला तरी सोशल मीडियाच्या गैरउपयोगामुळे आपले जीवन खराब होणार नाही, तसेच आपल्या आई-वडिलांचा विश्वासघात होणार नाही याबाबत उदबोधन केले. मित्रता ठेवताना कुठल्याही वाईट प्रवृत्तीकडे वळण्याचा प्रयत्न होणार नाही, याबाबत लक्ष द्यावे.
या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. समीर अल्लुरवार यांनी केले.या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.