Category: किसान शास्त्रज्ञ मंच बैठक
written by Chandrakant Maniyar | January 30, 2026

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
मूल येथील कृषी महाविद्यालय, द्वारा आयोजित 38 वी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २९ जानेवारी, २०२६ गुरुवार रोजी ग्राम बेलघाटा येथे संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, प्रगतशील शेतकरी रविंद्र गुरुनुले, दिलीप उईके, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “ उन्हाळी हंगामात विविध पिकांची लागवड व व्यवस्थापन ” या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी, शेतीत होणाऱ्या खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करताना योग्य वाणाची निवड करणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेतीतील शाश्वत उत्पादनासाठी पारंपारिक पिकांसोबत फळझाडांची व भाजीपाला पिकांची लागवड करणे काळाची गरज आहे असे सांगितले. उद्यानविद्या विभागाचे प्रा.डॉ. आर. पी. गजभिये, यांनी शेतकऱ्यांनी फणस, जांभूळ, सिताफळ आणि शेवगा या फळझाडांची लागवड करून अधिक आर्थिक मिळकत मिळवू शकते, तसेच उन्हाळी हंगामात धान पिकाऐवजी वांगे, टमाटर, कोथिंबीर यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड सुधारित तंत्रज्ञानाच्या वापर व कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषिविद्या विषयतज्ञ स्वप्नील ठाकरे, यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच उन्हाळी भात व मका पिकातील तण व खत व्यवस्थापन तसेच धानाच्या तनिसाचा व जैविक विघटकाच्या वापर करून कंपोस्ट खत तयार करून त्याच्या वापर जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी करावे असे सुचविले.
वनस्पतीशास्त्र विषयतज्ञ डॉ. सुवर्णा नगराळे, यांनी बियाणांची निवड करत असतांना सत्यप्रत व सुधारित बियाणांची निवड करावे यावर मार्गदर्शन केले.
वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ डॉ. गीतांशु डिंकवार यांनी अळिंबी उत्पादन पर्यायी उत्पनाचे साधन या विषयावर मार्गदर्शन केले. धानाच्या तनिसाचा वापर करून शेतकरी अळीबी उत्पादन घेऊ शकतात व आर्थिक उत्पनाचे पर्यायी साधन म्हणून अळिंबी लागवड करावी तसेच उन्हाळी भात व भाजीपाला पिकांच्या लागवडी अगोदर बिजप्रकियेतील महत्व सांगितले.
सदर कार्यक्रमास एकुण ५६ शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार डॉ. स्वप्नील ठाकरे कृषिविद्या विषयतज्ञ, यांनी मानले.