मूल येथील कृषि महाविद्यालयाची शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बेचाळीसावी बैठक संपन्न

मुल ( चंद्रकांत मनियार )

        मूल येथील कृषी महाविद्यालय अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बेचाळीसावी बैठक दिनांक २० मे, २०२६ बुधवार रोजी मौजा बेलगाटा ता. मुल जि. चंद्रपूर येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी बेलगाटा येथील शेतकरी बांधव तसेच कृषि महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने खरीप पूर्वतयारी व योग्य व्यवस्थापन आणि समृद्ध खरीप हंगाम या विषयावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, मूल यांनी शेतकऱ्यांनी विविध धान वाणांची निवड करून हवामान बदलाला अनुरूप शेती पद्धती अवलंबावी. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी गांडूळखत निर्मिती, जैविक खतांचा वापर व बिजप्रक्रीया करण्याचे महत्व यावेळी सांगण्यात आले. तसेच तांत्रिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादनात वाढ होऊन शेती अधिक फायदेशीर होऊ शकते, असे सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संबधित विविध विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.


उद्यानविद्या विभागाचे प्रा.डॉ. रमाकांत गजभिये,  यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक धान पिकासोबतच आंबा, फणस, यांसारख्या फळझाडांची लागवड करून अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावेत, असे आवाहन करण्यात आले. धान पिकासोबत फळझाडाची लागवड केल्याने जमिनीचा योग्य वापर होऊन भविष्यात दीर्घकाळ नियमित उत्पन्न मिळू शकते. फणसाच्या फळांना बाजारात चांगली मागणी असते. विशेष म्हणजे अतिशय कमी खर्चात व व्यवस्थापनात सुद्धा या फळझाडांची लागवड केली जाऊ शकते. याबद्दल मार्गदर्शन केले. कृषि अभियांत्रिकी विषय तज्ञ डॉ. अमरदीप डेरे, यांनी गटशेती आणि हवामान अंदाज ॲप्लिकेशनचा वापर आजच्या आधुनिक शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. गटशेतीमुळे शेतकरी एकत्र येऊन बियाणे, खते, औषधे व यंत्रसामग्री कमी खर्चात उपलब्ध करून घेऊ शकतात. हवामान अंदाज ॲप्लिकेशनच्या मदतीने पिकांचे नुकसान कमी होऊन उत्पादनात वाढ होते व शेती अधिक फायदेशीर बनते असे सांगितले. कृषीविद्या विषय तज्ञ प्रा. देवानंद कुसुंबे, यांनी धान पिकातील उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सुधारित वाणांची निवड, बियाण्यांची बीजप्रक्रिया, योग्य अंतरावर लागवड, तणनियंत्रण, संतुलित खत व्यवस्थापन तसेच सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर देण्यात आला. तसेच पाण्याचा योग्य नियोजनबद्ध वापर आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. वनस्पतीरोगशास्त्र विषयतज्ञ डॉ.  प्रविणा बरडे, यांनी तुरी व धान पिकातील भविष्यात येणाऱ्या मर, मुळकुज, करपा, कडाकरपा इ. रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी बीज प्रक्रियेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले. जैविक खते व बुरशीनाशके जसे रायझोबीयम, अ‍ॅझोटोबॅक्टर, बॅसिलस, स्यूडोमोनास, व ट्रायकोडर्मा इ. वापरण्यास सांगितले तसेच रासायनांच्या अतिवापराने सूक्ष्मजिवांवर व पिकांवर काय परिणाम होतो यावर मार्गदर्शन केले.  कृषि वनस्पतीशास्त्र विषयतज्ञ डॉ. सुवर्णा नगराळे, यांनी एल निनो सारख्या संभावीत नैसर्गिक आपत्ती लक्ष्यात घेवून शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या आणि कमी पाण्यावर उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी असा सल्ला दिला तसेच बियाणे खरेदी करताना प्रमाणित बियाणे व सत्यप्रतिचे बियाणे लागवडीसाठी वापरावे कारण ते बियाणे आनुवंशिक, भौतिकदृष्ट्या शुद्ध असते त्यामुळे उत्पादकता वाढण्यासाठी मदत होते.

सदर कार्यक्रमास एकुण ३६ शेतकरी व ६ शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ. अमरदीप डेरे यांनी मानले.