Category: कीटकनाशक हाताळणी
written by Chandrakant Maniyar | June 12, 2026

लोणवाही येथे कृषीकन्या द्वारे सुरक्षित किटकनाशक हाताळणी जनजागृती कार्यक्रम
मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
शेतक-यांनी कीटकनाशकांचा शास्त्रोक्त पद्धतीने कसा प्रभावी वापर करावा तसेच मानवी आरोग्य कसे जपावे सुनिश्चित करावे, या हेतूने मूल येथील कृषी महाविदयालया च्या कृषि कन्या द्वारे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत सुरक्षित कीटकनाशक हाताळणी याविषयी सिंदेवाही तालुक्यातील लोणवाही या गावात जनजागृती – कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम कृषी महाविद्यालय, मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही जे. अतकरे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आला. तसेच, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी गजभिये, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे, रावे प्रभावी डॉ. देशपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे तसेच कीटकशास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. भूषण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाच्या विदयार्थीनी कु.करुणा साहू, कु.महारुख शेख, कु.मोहिनी तिखट, कु.पल्लवी उरकुडे आणि कु.श्रध्दा वालोदे यांनी शेतक-यांना कीटकनाशकांची निवड, फवारणीपूर्व तयारी व हाताळणा-या व्यक्तीने घ्यावयाची काळजी व उपाय योजनाबाबत माहिती दिली.
यामध्ये कीटकनाशकांचा वापर करताना हातमोजे, मास्क, गॉगल्स व संरक्षक कपड्यांचा वापर करणे, शिफारस केलेल्या मात्रेतच औषधांची फवारणी करणे आणि रिकाम्या बाटल्या अथवा कंटेनरची योग्य विल्हेवाट लावणे याविषयी विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे कीटकनाशकांच्या अयोग्य वापरामुळे होणारे आरोग्यविषयक दुष्परिणाम, पर्यावरणीय हानी तसेच उपयुक्त कीटकावरील परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. कीड व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचाही सल्ला दिला.
या कार्यक्रमाला परिसरातील शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सुरक्षित कीटकनाशक वापरामुळे शेतकरी ग्राहक आणि पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. उत्पादनासाठी शाश्वत शेती व सुरक्षित अन्न हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही यावेळी नमुद करण्यात आले.