कृषी महाविद्यालय मूलच्या विद्यार्थिनींकडून किन्ही गांव च्या शेतकऱ्यांना दिले चारा प्रक्रिया प्रात्यक्षिक – शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुल-मरोडा येथील RAWE कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी किन्ही गावात “चारा प्रक्रिया – युरिया मळी व युरिया उपचार” या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले.

या उपक्रमात कृषी महाविद्यालय, मुल  येथील  ग्रामीण कृषी कार्यानुभव ( RAWE  ) च्या विद्यार्थिनी कु. भाग्यश्री घागी, कु.. हिरल गोंगले, कु. प्रणाली गुरनुले, कु.. मोनाली हातिमारे आणि कु. आचल कडस्कर यांनी शेतकऱ्यांना कमी खर्चात दुधाचे उत्पादन वाढवण्याची पद्धत पटवून दिल्ली आणि त्याच सोबतच प्रात्यक्षिक पण करून दाखवले.

या कार्यक्रमात निकृष्ट दर्जाचा कोरडा चारा, धानाचा पेंढा यावर युरियाची प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता कशी वाढवावी हे प्रत्यक्ष करून दाखवले. युरिया व पाणी याचे द्रावण तयार करून धनाच्या पेंढ्याच्या थरावर शिंपडण्याची पद्धत, 21 दिवस प्लास्टिकने झाकून ठेवल्यावर प्रथिनांचे प्रमाण 3% वरून 8% पर्यंत कसे वाढते, याची सविस्तर माहिती विद्यार्थिनींनी दिली.

किन्ही गावातील पशुपालक शेतकऱ्यांनी या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. “उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. पेंढा खाऊन दूध कमी येते. पोरींनी सांगितलेली ही पद्धत एकदम सोपी व कमी खर्चाची आहे. आता आम्ही नक्की करून बघू,” असे मत श्री. नानाजी करपाते यांनी व्यक्त केले.

कृषी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे , कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, कृषि संशोधन केंद्र प्रभारी डॉ. प्रविण देशपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे आणि विशेषज्ञ प्राध्यापक डॉ. सतिश मुन्नारवार  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यांच्या मागदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम शेतकऱ्यांना उपयुक्त व फायदेशीर ठरला.