मूल शहरात भटक्या कुत्र्यांचा धोका वाढत आहे

 तीन वर्षांच्या चिमुकल्यासह ५० वर्षीय व्यक्तीलाही चावा

मूल ( मेहुल मनियार )

       मूल शहरातील ताडाळा रोड परिसरातील वीर सावरकर वॉर्ड क्रमांक १२ येथे भटक्या कुत्र्याने तीन वर्षांच्या देवांश पवन वायडे या चिमुकल्याला आणि ५० वर्षीय प्रशांत मोरे यांनाही चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांना रस्त्यावरून चालताना किंवा मुलांना घराबाहेर खेळताना भीतीच्या वातावरणात राहावे लागणे ही गंभीर बाब आहे.

       मूल नगर परिषद आणि संबंधित प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन शहरातील भटक्या व आक्रमक कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण ठेवावे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि सुरक्षित व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. विशेषतः शाळा, अंगणवाड्या आणि रहिवासी वस्त्यांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.

आज तीन वर्षांच्या चिमुकल्याला आणि एका ५० वर्षीय व्यक्तीला कुत्र्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले. उद्या अशी घटना दुसऱ्या कोणासोबत घडण्याची वाट प्रशासन पाहणार आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

नागरिकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रश्नावर तातडीने कार्यवाही करून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी आणि मानवीय उपाययोजना कराव्यात, ही मागणी केली जात आहे.