Category: समस्या
written by Chandrakant Maniyar | October 5, 2026

आ.मुनगंटीवार यांच्या २७ सप्टेंबरच्या पाहणीत निदर्शनास आलेल्या समस्या व प्रलंबित बाबींवर होणार उद्या सविस्तर चर्चा
अत्याधुनिक ‘कृषी ज्ञानसंकुला’च्या संकल्पनेला मिळणार दिशा; संशोधन, ई-लायब्ररी, प्रयोगशाळा, वसतिगृहांसह विविध सुविधांच्या विकासाचा आढावा
मुल ( प्रा.चंद्रकांत मणियार )
मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या समस्या आणि भविष्यातील गरजा प्रत्यक्ष पाहणीतून जाणून घेतल्यानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला असून, या प्रश्नांवर उद्या, ६ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. २७ सप्टेंबर रोजी मुलच्या कृषी महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी करत आ. मुनगंटीवार यांनी महाविद्यालयातील विविध समस्या, उपलब्ध सुविधा, प्रलंबित बाबी आणि भविष्यातील विकासाच्या गरजा जाणून घेतल्या होत्या. पाहणीत निदर्शनास आलेल्या या सर्व बाबींवर तातडीने कार्यवाही व्हावी आणि महाविद्यालयाच्या विकासाला गती मिळावी, यासाठी त्यांनी संबंधित विभागासोबत बैठक घेण्याचा पुढाकार घेतला आहे.
मुल येथील कृषी महाविद्यालय केवळ पारंपरिक पद्धतीने कृषी शिक्षण देणारी संस्था न राहता, शिक्षण, संशोधन, नवतंत्रज्ञान, प्रयोग आणि प्रत्यक्ष शेती यांची प्रभावी सांगड घालणारे अत्याधुनिक ‘कृषी ज्ञानसंकुल’ म्हणून विकसित व्हावे, ही आ. मुनगंटीवार यांची भूमिका आहे. त्याच अनुषंगाने २७ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांनी महाविद्यालयाची सविस्तर पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान विविध प्रयोगशाळा, ग्रंथालय, पॉलीहाऊस, वसतिगृहाची जागा तसेच संपूर्ण परिसराची पाहणी करून त्यांनी प्राचार्य, प्राध्यापक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली होती.
महाविद्यालयाच्या विकासासाठी नवीन व आधुनिक डिझाईन, विद्यमान नकाशामध्ये आवश्यक फेरबदल, प्रेझेंटेशन हॉल, कृषी विषयक अत्याधुनिक ई-लायब्ररी तसेच देश-विदेशातील कृषी विद्यापीठांशी थेट संवाद साधता यावा यासाठी टू-वे कम्युनिकेशन व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने आ. मुनगंटीवार यांनी सूचना केल्या होत्या. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता जागतिक स्तरावरील कृषी संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाशी त्यांचा थेट संपर्क यावा, हा या संकल्पनेमागील व्यापक उद्देश आहे.
महाविद्यालयाचा संपूर्ण परिसरच विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानाचा समृद्ध परिसर’ ठरावा, यासाठीही आ. मुनगंटीवार यांनी विविध सूचना केल्या होत्या. परिसरातील वृक्षांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे, कृषीविषयक विविध बाबींची माहिती देणारे साईन बोर्ड उभारणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक स्वरूपात दर्शन घडविणे, तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे, या बाबींचा विकास आराखड्यात समावेश करण्याची भूमिका त्यांनी मांडली होती.महाविद्यालयातील मुला-मुलींच्या वसतिगृहांचा विकास, विद्यार्थ्यांच्या सुविधांमध्ये वाढ, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांचा आढावा आणि महाविद्यालयातील रिक्त पदांची पूर्तता यांसारख्या महत्त्वाच्या बाबींकडेही आ.मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले होते. महाविद्यालयाची इमारत, परिसर, स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीनेही आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यासोबतच कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून सीड स्टोरेज, पारंपरिक व महत्त्वपूर्ण बियाण्यांचे संवर्धन, जनुक संकलन व संशोधन, टिश्यू कल्चर, नर्सरी विकास यांसारख्या क्षेत्रांना चालना देण्याची गरज आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. रेन वॉटर हार्वेस्टिंग, विविध गाईंच्या प्रजाती, पिकांची विविधता, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि स्थानिक कृषी परंपरांचा अभ्यास यांचा समावेश असलेली व्यापक संकल्पना त्यांनी मांडली.चंद्रपूर जिल्ह्याच्या कृषी सामर्थ्याला व्यापक बाजारपेठ आणि ओळख मिळावी, यासाठी ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट’मध्ये धान पिकाचा समावेश करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्याची भूमिका आ.मुनगंटीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केली. जिल्ह्यातील कृषी उत्पादन, स्थानिक ज्ञान आणि आधुनिक संशोधन यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी कृषी महाविद्यालयाने केंद्रबिंदूची भूमिका बजावावी, अशी आ.मुनगंटीवार यांची यामागची अपेक्षा आहे.
मुल कृषी महाविद्यालयाच्या विविध प्रलंबित बाबींवर चर्चा करण्यासाठी कृषी विभागाकडून ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. कृषी महाविद्यालयाच्या विकासासंदर्भातील या बैठकीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून, महाविद्यालयाच्या सद्यस्थितीचा आढावा, प्रलंबित प्रश्न आणि पुढील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आमंत्रित करून अजयपूर येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्राची पाहणी घडवून आणण्याच्या दृष्टीनेही पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी पीडीकेव्ही आणि कृषी महाविद्यालयाने संयुक्तपणे सविस्तर प्रेझेंटेशन तयार करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी यापूर्वीच दिल्या आहेत.
मुलच्या कृषी महाविद्यालयाचा विकास हा केवळ एका शैक्षणिक संस्थेच्या पायाभूत सुविधांचा विषय नसून, चंद्रपूरच्या कृषी भवितव्याला नवी दिशा देणारा व्यापक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या हातात आधुनिक ज्ञान, संशोधनाला आवश्यक पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष उत्तर शोधणारी संशोधनव्यवस्था उभी राहिली, तर त्याचा लाभ संपूर्ण जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला होऊ शकतो. याच व्यापक दृष्टिकोनातून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष पाहणीपासून ते आता मंत्रालयीन बैठकीपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवला असून, उद्याची बैठक मुलच्या कृषी महाविद्यालयाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.