Category: वृक्षारोपण कार्यक्रम
written by Chandrakant Maniyar | August 21, 2026

मूल ( मेहुल मनियार )
शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्रसेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने, प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पेड माँ के नाम’ तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसर तसेच क्रीडांगण परिसरात कडुनिंब, पिंपळ, सीताफळ, जांभूळ, करंज, शिवण, वड आदी विविध प्रजातींच्या एकूण ७५ रोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वृक्षारोपण उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी दोन वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेली रोपे जगविण्याचा संकल्प महाविद्यालय परिवाराने केला आहे. एखादे रोप नैसर्गिक अथवा अन्य कारणांमुळे जगू शकले नाही, तर त्याठिकाणी नवीन रोप लावून त्याचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही संबंधितांनी स्वीकारली आहे. त्यामुळे ‘वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा’ हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

वाढते तापमान, बदलते हवामान आणि दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेता वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर कर्मवीर महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरणाविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा ठरला.
वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी NCC अधिकारी डॉ. उज्वला कापगते, NSS अधिकारी डॉ. प्रविण उपरे, डॉ. केवल कऱ्हाडे, प्रा. राहुल बोधे, प्रा. अनिल शेलेकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, NSS स्वयंसेवक व NCC कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले.