गुरुजनांच्या संस्कार आणि मार्गदर्शनामुळे आम्ही उच्चपदस्थ पोहोचू शकलो…. माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले विचार
Category: माजी विद्यार्थी स्नेह मिलन

- मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
कर्मवीर महाविद्यालयात 2006 ते 2008 या सत्रात शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एका अत्यंत उत्साही आणि भारलेल्या वातावरणात ‘स्नेह मिलन सोहळा’ पार पडला. विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्नेह मिलन सोहळ्याच्या निमित्ताने गुरुजनांचा सत्कार समारोह आयोजित केला होता. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या गुरुजनांचा केलेला सत्कार होय. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी अश्विनी मुरकुटे, भाग्यश्री नमुलवार, प्रतीक्षा नागदेवते, सुभाष गेडाम
आणि मंगेश गोवर्धन या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयीन काळातील शिक्षकांच्या शिस्तीच्या आठवणींना उजाळा दिला. “आज आम्ही जीवनात ज्याही कुठल्या उच्च पदावर पोहोचलो आहोत, त्यामागे आमच्या गुरुजनांचे संस्कार आणि त्यांचे मार्गदर्शनच आहे,” असे भावूक उद्गार अनेक विद्यार्थ्यांनी काढले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता व्यक्त करतांना सांगितले की, आज आम्ही समाजात ज्याही कुठे आहोत, त्याचे संपूर्ण श्रेय आमच्या शिक्षकांना जाते. त्यांनी फक्त आम्हाला पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायला शिकवले.”
केवळ अभ्यासक्रम शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्यांना आकाशात झेप घेण्यासाठी बळ देण्याचे काम शिक्षकांनी केले.”
कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर, प्रा.डॉ. गणेश गायकवाड, प्रा. डॉ. उज्वला कापगते, प्रा.चंद्रकांत मणियार, प्रा. रवींद्र बुरांडे, प्रा. व्ही. यू. पुस्तोडे, प्रा. पल्लवी वाकडे मंचावर उपस्थित होते.

आठवणींना उजाळा आणि भावनिक क्षण याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित सर्व गुरुजनांचा गौरव शाल, श्रीफळ, भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांकडून मिळालेला हा सन्मान पाहून अनेक गुरुजनांचे डोळे आनंदाने पाणावले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपस्थित शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या प्रेमाबद्दल आणि कृतज्ञतेबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच, विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच एकत्र येऊन सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.
