Category: नगर परिषद निवडणूक
written by Mehul maniyar | January 20, 2026
मूल
नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्ष पदासह एकूण २० पैकी तब्बल १८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदावर एकता प्रशांत समर्थ यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राकेश रत्नावार यांची गटनेता तसेच उपाध्यक्ष पदावर निवड झाली असून, पक्षातील नेतृत्व अधिक बळकट झाले आहे. तसेच नगरपरिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसचे गुलाब खान पठाण आणि बंडू गुरुनुले यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, नगरपरिषद सभापती पदाची निवड आज २० जानेवारी रोजी होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया काही काळासाठी स्थगित ठेवण्यात आली होती. मात्र आज सायंकाळपर्यंत सभापती पदाचा अंतिम निर्णय स्पष्ट होणार आहे.
सभापती पदासाठी इच्छुकांनी आपापली फिल्डिंग लावली असून, कोणाला हा मानाचा पदभार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आजचा दिवस मूलच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.