Sunday, April 19, 2026
Homeस्पर्धा परीक्षा मार्गदर्शनसंघर्षातून जीवन घडते- श्री.उमेश कापगते.. कृषि महाविद्यालय, मुल येथे स्पर्धा परीक्षेकरिता...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

संघर्षातून जीवन घडते- श्री.उमेश कापगते.. कृषि महाविद्यालय, मुल येथे स्पर्धा परीक्षेकरिता व्याख्यानाचे आयोजन

मूल  ( प्रा. चंद्रकांत मनियार )

     कृषि महाविद्यालय, मुल येथील प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने १७ एप्रिल, २०२६ रोजी “एमपीएससी परीक्षेची तयारी (सामान्य, PSI, STI व ASO)” या विषयावर ९वे अतिथी व्याख्यान उत्साहात आयोजित करण्यात आले.

      या कार्यक्रमास प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी, चंद्रपूर चे उमेश एम. कापगते हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे तसेच डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. वनस्पती रोग शास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक  डॉ. गितांशु डिंकवार यांनी प्रास्ताविक भाषणातुन कार्यक्रमाचा हेतू समजावून सांगितला.
प्रमुख मार्गदर्शक उमेश कापगते यांनी आपल्या व्याख्यानात एमपीएससी परीक्षेची संरचना, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन तसेच विविध पदांसाठी आवश्यक असलेल्या तयारीबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. व्याख्यानादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने चर्चा करत त्यांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी अत्यंत सोप्या व स्पष्ट भाषेत उत्तरे देत मार्गदर्शन केले. त्यांच्या या संवादातून विद्यार्थ्यांना परीक्षेची दिशा अधिक स्पष्ट झाली. यावेळी त्यांनी आपल्या जीवनप्रवासाविषयी सांगताना अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अधिकारी पदापर्यंतचा प्रवास कसा साध्य केला, याचे प्रेरणादायी उदाहरण विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या या संघर्षमय वाटचालीने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले व यश मिळविण्यासाठी कोणतीही परिस्थिती अडथळा ठरू शकत नाही, असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला.

उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दिशा, चिकाटी व आत्मविश्वास या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. त्यांनी नियमित अभ्यास, वर्तमान घडामोडींचे ज्ञान आणि वेळेचे योग्य नियोजन यावर भर दिला. तसेच अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाण्याची वृत्ती ठेवावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला न घाबरता ज्यांनी यशाचे शिखर गाठले अशा अनेक यशस्वी व्यक्तिमत्वांची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीला अडथळा म्हणून न बघता संधी म्हणून बघा असा मोलाचा संदेश दिला.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी अशा व्याख्यानांचा अधिकाधिक लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांची योग्य तयारी करावी, असे सांगितले. त्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर यश निश्चित मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असून अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नागेश नवघरे सहाय्यक प्राध्यापक (मृद विज्ञान) यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गितांशु डिंकवार यांनी मानले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता वाढली असून त्यांना योग्य दिशेने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळण्यास मदत होईल. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!