Wednesday, October 21, 2026
Homeमार्गदर्शन कार्यक्रममूल येथील कृषि महाविद्यालयातर्फे उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषि महाविद्यालयातर्फे उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
कृषी महाविद्यालय, मुल येथील प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच अंतर्गत दिनांक १७ फेब्रुवारी, २०२६ रोजी “उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून स्वच्छ भारत अभियानाचे माजी सल्लागार, राजगड (आदर्श गाव) चे उपसरपंच तसेच प्रगतिशील शेतकरी मा. श्री चंदू पाटील मारकवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे तसेच डॉ. आर. पी. गजभिये प्राध्यापक (उद्यानविद्या) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रा. नागेश नवघरे सहाय्यक प्राध्यापक (मृद विज्ञान) यांनी प्रास्ताविकता केली.
चंदु पाटील मारकवार यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे महत्त्व पटवून दिले. कृषी क्षेत्रात पारंपरिक शेतीबरोबरच मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, ब्रँडिंग आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले. गंगोत्री राईस मिलच्या स्थापनेपासून ते यशस्वी उद्योग उभारणीपर्यंतचा आपला प्रवास सांगताना त्यांनी जिद्द, प्रामाणिकपणा आणि सातत्य या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. अपयशाला न घाबरता त्यातून शिकण्याची वृत्ती अंगीकारल्यास यश निश्चित मिळते, असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला. विशेष म्हणजे, राजगड या गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये मारकवार सर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी गावकऱ्यांना एकत्रित करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली, संपूर्ण गाव स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्न उभारले. त्यांच्या नेतृत्वाखाली गावाने स्वच्छता उपक्रम यशस्वीपणे राबवून राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील ‘आदर्श गाव’ पुरस्कार पटकावला. गावविकास, एकोप्याची भावना आणि सामाजिक बांधिलकी यांचे त्यांनी उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी यांवर भर दिला. विद्यार्थी जीवनातच ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील युवकांनी शेतीपूरक उद्योग उभारून स्वावलंबी व्हावे आणि इतरांसाठी रोजगारनिर्मिती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.


डॉ. आर. पी. गजभिये यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करून त्यांना योग्य दिशा दिली. आपण कुठे चुकतो हे लक्षात घेऊन त्यावर सखोल चिंतन करा त्यांनी तुमचे प्रश्न सहज सुटतील असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणातुन डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता ‘जॉब सीकर’ म्हणजे जॉब मिळविणारे बनण्यापेक्षा ‘जॉब क्रिएटर’ म्हणजेच जॉब देणारे बनण्याचा दृष्टिकोन स्वीकारावा, असे प्रतिपादन केले. आपल्याला काय पाहिजे आणि काय व्हायचंय हे निश्चित करून त्यासाठी अविरतपणे परिश्रम करावे असा संदेश दिला. या प्रकारचे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
या व्याख्यान कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गितांशु डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) व आभारप्रदर्शन श्री. नागेश नवघरे सहाय्यक प्राध्यापक (मृद विज्ञान) यांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!