आधुनिक डिझाईन, ई-लायब्ररी, टू-वे कम्युनिकेशन, संशोधन व सीड स्टोरेजसह कृषी शिक्षणाला नवी दिशा
५ ऑक्टोबरला कृषिमंत्र्यांसोबत बैठक; चंद्रपूर दौऱ्यात अजयपूर शेतकरी प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याचे निमंत्रण
मुल ( प्रा.चंद्रकांत मनियार )
शेतकऱ्याच्या कष्टाला आधुनिकतेची थेट जोड मिळाली, तर शेतीच्या प्रगतीला नवे क्षितिज मिळू शकते; या जाणिवेतून मुल येथील कृषी महाविद्यालयाचा विकास केवळ इमारत आणि सुविधांपुरता मर्यादित न ठेवता, शिक्षण, संशोधन, नवतंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष शेती यांची सांगड घालणारे अत्याधुनिक ‘कृषी ज्ञानसंकुल’ म्हणून करण्याचा संकल्प राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला प्रयोगांची जोड मिळावी, संशोधनातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधले जावेत आणि कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचावे, या व्यापक दृष्टिकोनातून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल कृषी महाविद्यालयाची पाहणी करून भविष्यातील विकासाचा सविस्तर आढावा घेतला.
मुल येथील कृषी महाविद्यालयाला भेट देत आ. मुनगंटीवार यांनी विविध प्रयोगशाळा, ग्रंथालय, पॉलीहाऊस तसेच महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी केली. यावेळी पी.डी.के. व्ही. अकोला चे उपकुलसचिव डॉ. एस. एस. चव्हाण, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय डॉ. विलास अतकरे, भाजपा मुल शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, सहयोगी संशोधन संचालक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, संतोष भावदे, सहायक प्रा. डॉ. विशाखा डोंगरे, सहाय्यक प्राध्यापक शाम पतींगे, आर्किटेक चिन्मय पाटील आदींची उपस्थिती होती. डॉ. विलास अतकरे यांनी आम. मुनगंटीवार यांचे स्वागत केले.





