Friday, August 21, 2026
Homeकृषि दिवसकृषि सप्ताहनिमित्त तिसऱ्या दिवशी कृषि शास्त्रज्ञांची शेतकऱ्यांच्या बांधावर भेट; एकात्मिक शेती व...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि सप्ताहनिमित्त तिसऱ्या दिवशी कृषि शास्त्रज्ञांची शेतकऱ्यांच्या बांधावर भेट; एकात्मिक शेती व नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन

image_pdfimage_print

मुल  ( प्रा. चंद्रकांत मनियार )

       कृषि सप्ताहाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे मा. कुलगुरू , डॉ. शरदराव गडाख,  यांनी केल्यानुसार कृषि महाविद्यालय, मुल यांच्या वतीने मूल तहसील मधील ग्राम. मारोडा येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्या दिवशी कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एकात्मिक शेती व नैसर्गिक शेतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि महाविद्यालयाचे डॉ. रमाकांत गजभिये, प्राध्यापक, (उद्यानविद्या), डॉ. प्रवीण घुबे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), डॉ. भूषण ठाकरे (किटकशास्त्र), श्री. देवानंद कुसुंबे (कृषिविद्या), आणि श्री. अजय उईके (कृषि विस्तार शिक्षण) यांनी विविध पिके व पूरक व्यवसायांची प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन केले. यावेळी कापूस, भाजीपाला तसेच मल्चिंगवर घेतलेल्या वांगी व टमाटरच्या पिकाची पाहणी करण्यात आली. वांग्यामध्ये कलम (ग्राफ्टिंग) तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मुळकूज व मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन झाडांची वाढ जोमदार होते, उत्पादनात वाढ होते, तसेच पिकाचे आयुष्य वाढते, असे सांगण्यात आले. शेतभेटीदरम्यान कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांनी उभारलेल्या सेंद्रिय कंपोस्ट (कंपोस्ट खत) निर्मिती युनिटची पाहणी केली. नैसर्गिक व शाश्वत शेतीसाठी शेतावरच सेंद्रिय खत निर्मिती करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृत, बीजामृत, आच्छादन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर व रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कृषि शास्त्रज्ञांनी शेताच्या बांधावर लागवड केलेल्या निलगिरीच्या झाडांची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, निलगिरीचा उपयोग संरक्षक पट्टा (Shelterbelt) म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेताच्या कडेला योग्य अंतरावर निलगिरीची लागवड केल्यास जोरदार वाऱ्याचा वेग कमी होऊन पिकांचे संरक्षण होते, मातीची धूप कमी होते तसेच शेतातील सूक्ष्म वातावरण (Microclimate) सुधारण्यास मदत होते. तसेच शेततळे (फार्म पाँड) उभारणीमुळे संरक्षित सिंचन, पावसाच्या पाण्याचे साठवण आणि वर्षभर शेतीसाठी पाण्याची उपलब्धता याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. शेतातील पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच गिर व साहीवाल या देशी व जर्सी या विदेशी गोवंशाच्या संगोपनाचे आर्थिक फायदे, संतुलित आहार, आरोग्य व्यवस्थापन व उत्पन्नवाढीच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेततळ्यामध्ये मत्स्यपालन हा शेतीला पूरक व फायदेशीर व्यवसाय असल्याचे कृषि शास्त्रज्ञांनी सांगितले. विशेषतः रोहू, कतला आणि मृगळ या भारतीय प्रमुख मत्स्य प्रजातींचे संयुक्त संगोपन (Composite Fish Culture) केल्यास शेततळ्याच्या विविध पाण्याच्या स्तरांचा प्रभावी वापर होऊन अधिक उत्पादन मिळते. कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून स्थानिक परिस्थितीनुसार सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनीही प्रत्यक्ष बांधावर मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन व उत्पन्न वाढविण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. उपस्थितांचे आभार डॉ. प्रवीण घुबे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) यांनी मानले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!