Wednesday, October 21, 2026
Homeकृषि दिवसकृषि सप्ताहनिमित्त चौथ्या दिवशी कृषि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि सप्ताहनिमित्त चौथ्या दिवशी कृषि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

image_pdfimage_print

मुल  ( प्रा. चंद्रकांत मनियार )

कृषि सप्ताहाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना  डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू  मा.डॉ. शरदराव गडाख यांनी केल्यानुसार कृषि महाविद्यालय, मुल यांच्या वतीने ग्राम. मरेगाव ता. मुल जि. चंद्रपूर येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली “शेतकऱ्यांच्या बांधावर कृषिशास्त्रज्ञ” हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन खरीप हंगामातील धान पिकाच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शेतातील परिस्थितीची पाहणी करून समस्यांनुसार उपाययोजना सुचविण्यात आल्या. सदर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि महाविद्यालयाचे श्री. एस. पी. पतिंगे, सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र), डॉ. ए. जे. इंगोले (मृद विज्ञान), डॉ. गीतांशु डिंकवार (वनस्पती रोगशास्त्र), श्री. देवानंद कुसुंबे (कृषिविद्या) आणि श्री. अजय उईके (कृषि विस्तार शिक्षण) यांनी धान बियाण्याची पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करण्याचे महत्त्व, ट्रायकोडर्मा, अझोस्पिरिलम, पीएसबी यांसारख्या जैविक घटकांचा वापर, तसेच बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर मृदापरीक्षण अहवालाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन, नत्र, स्फुरद व पालाश यांचा योग्य प्रमाणात आणि योग्य टप्प्यावर वापर, तसेच झिंक, गंधक, लोह यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. धान पिकामध्ये (पिकेव्ही ‘श्री’) पद्धतिचा अवलंब करावा असे सांगण्यात आले, यामध्ये ५ किलो बियाणे प्रती हेक्टरी घ्यावे व ८ ते १५ दिवसाचे रोपे लागवडीकरिता घेण्यात यावे, त्यानंतर रोवणी करतांनी लवकर येणाऱ्या धान जातींची २०x२० सें.मी. अंतरावर, तसेच मध्यम व उशिरा कालावधीच्या वाणांची २५x२५ सें.मी. अंतरावर प्रति चुड एक रोप लावून लागवड करावी असे सांगण्यात आले. या पद्धतीच्या वापरामुळे बियाण्याची बचत होते. प्रचलित पद्धतीपेक्षा शाश्वत व २० ते ३० टक्के अधिक उत्पादन मिळते असे सांगण्यात आले.
धान पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तणांचा प्रादुर्भाव उत्पादनावर मोठा परिणाम करतो. त्यामुळे तणांचे वेळेवर नियंत्रण करण्यासाठी शिफारशीनुसार तणनाशकांची निवड, फवारणीची योग्य वेळ, पाण्याचे व्यवस्थापन आणि सुरक्षित फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शास्त्रज्ञांनी सखोल माहिती दिली. याशिवाय तणनाशकांचा अतिरेक टाळून “एकात्मिक तण व्यवस्थापन” करण्याचे सांगण्यात आले. तसेच धान पिकावरील खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, तपकिरी तुडतुडे यांसारख्या प्रमुख किडींची ओळख, त्यांचे आर्थिक नुकसानीचे स्तर, तसेच करपा, शीथ ब्लाइट, ब्लास्ट यांसारख्या रोगांची लक्षणे ओळखून वेळेत नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत माहिती देण्यात आली. रासायनिक उपायांबरोबरच जैविक नियंत्रण, शेताची स्वच्छता, संतुलित खतांचा वापर आणि नियमित पीक निरीक्षण यांवर भर देण्यात आला. यावेळी कृषि शास्त्रज्ञांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन, शेतातील पाण्याचा निचरा, तसेच पिकाची नियमित पाहणी करण्याचे महत्त्व सांगितले. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील विविध अडचणी व शंकांचे निरसन करून घेतले. शास्त्रज्ञांनी प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या परिस्थितीनुसार तांत्रिक सल्ला दिला. या कार्यक्रमामुळे आधुनिक कृषितंत्रज्ञान, शास्त्रोक्त पीक व्यवस्थापन आणि संशोधनाधारित शिफारशी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्या. यामुळे उत्पादनात वाढ, उत्पादन खर्चात बचत आणि गुणवत्तापूर्ण धान उत्पादन साध्य करण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!