Wednesday, October 21, 2026
Homeविद्युत सुरक्षामूल येथील कृषि महाविद्यालय, येथे विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि ऊर्जाबचतीबाबत जनजागृती...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषि महाविद्यालय, येथे विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि ऊर्जाबचतीबाबत जनजागृती कार्यक्रम

image_pdfimage_print

राष्ट्रीय सेवा योजना व महावितरण, मूल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

कृषि महाविद्यालय, मुल येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), मुल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये विजेच्या सुरक्षित वापराविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच हरित ऊर्जा आणि ऊर्जाबचतीचे महत्त्व अधोरेखित करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून महावितरण, मुल येथील उपकार्यकारी अभियंता श्री. विजय राठोड, सहाय्यक अभियंता श्री. विनायक चव्हाण आणि सहाय्यक अभियंता श्री. पंकज उजवणे उपस्थित होते. यावेळी सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाखा डोंगरे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमरदीप डेरे तसेच महावितरण कार्यालयातील कर्मचारीही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व सहाय्यक प्राध्यापक श्री. अजय उईके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी विजेचा योग्य वापर आणि ऊर्जाबचतीचे महत्त्व स्पष्ट केले. दैनंदिन जीवनात विजेचा अनावश्यक वापर टाळणे, विद्युत उपकरणांचा गरजेनुसार वापर करणे आणि उपलब्ध ऊर्जेचा कार्यक्षम वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील ऊर्जेची वाढती गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ऊर्जाबचतीची सवय अंगीकारावी आणि कुटुंबासह समाजातही याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.


प्रमुख अतिथी उपकार्यकारी अभियंता श्री. विजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. विजेचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेणे, विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करणे आणि ऊर्जेचा जबाबदारीने वापर करणे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कृषि क्षेत्रातही विद्युत सुरक्षेला विशेष महत्त्व आहे. सिंचनासाठी वापरले जाणारे विद्युत पंप, त्यांच्या जोडण्या आणि इतर विद्युत उपकरणांची नियमित तपासणी व देखभाल केल्यास सुरक्षित आणि कार्यक्षम वापरास मदत होते. या पार्श्वभूमीवर कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा आणि ऊर्जाबचतीविषयीची जागरूकता उपयुक्त ठरते असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थितांना विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करण्याची आणि ऊर्जाबचत करण्याची शपथ दिली.
तसेच सहाय्यक अभियंता श्री. विनायक चव्हाण यांनी हरित ऊर्जेची संकल्पना, सौरऊर्जा, अक्षय ऊर्जास्रोत आणि पर्यावरणपूरक ऊर्जावापराचे महत्त्व याविषयी माहिती दिली. पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी सौरऊर्जा व इतर अक्षय ऊर्जास्रोतांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने स्वच्छ ऊर्जेचा वापर महत्त्वाचा असल्याचे त्यांच्या मार्गदर्शनातून अधोरेखित झाले. विद्युत क्षेत्रातील विविध बाबींवर मार्गदर्शन करताना विजेचा सुरक्षित, कार्यक्षम आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. विद्युत उपकरणांचा योग्य वापर, ऊर्जाबचत आणि विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांनी सातत्याने जागरूक राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अजय उईके, सहाय्यक प्राध्यापक यांनी केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!