Saturday, August 22, 2026
Homeमालधक्का विरोधमूल मध्ये मालधक्का झाला तर रोजगार मिळणार नाही पण प्रदूषण वाढणार.
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल मध्ये मालधक्का झाला तर रोजगार मिळणार नाही पण प्रदूषण वाढणार.

image_pdfimage_print

मूल (मेहुल मनियार )

मागील काही दिवसांपासून मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित मालधक्का उभारून सुरजागड येथील लोहखनिजाची देशभर वाहतूक करण्याची योजना सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेसाठी काही राजकीय नेत्यांकडून मदत केली जात असल्याचा आरोप असून, या पार्श्वभूमीवर “मूल शहर बचाव संघर्ष समिती”च्या वतीने मालधक्का हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन
मूल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवित केले आहे. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,प्रस्तावित मालधक्का उभारल्यास स्थानिकांना अपेक्षित रोजगार मिळणार नसून, केवळ काही स्वार्थी घटकांना लाभ होणार असल्याचा आरोप करण्यात आला. मुल शहरात शेती पूरक व्यवसायाची वाढ व्हावी असे मत व्यक्त केले.रोजगाराचे आमिष दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याबाबत या वेळी स्पष्ट करण्यात आले.


मालधक्क्यामुळे मूल शहराला जलप्रदूषण, वायुप्रदूषण व ध्वनीप्रदूषणाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. परिणामी, स्वच्छ आणि विकसित शहर म्हणून ओळख असलेले मूल शहर धुळी मुळे लाल प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
यामुळे दररोज मोठया प्रमाणात अवजड (हायवा) वाहनांची वाहतूक होणार असल्याने अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सुरजागड परिसरातून होणाऱ्या लोहखनिज वाहतुकीदरम्यान बारीक धूळ आणि रासायनिक घटक हवेत व जमिनीवर पसरून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
प्रस्तावित मालधक्क्याच्या लगतच कर्मवीर महाविद्यालयाचे सार्वजनिक मैदान आहे. येथे दररोज नागरिक व्यायामासाठी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. या परिसरात मालधक्का उभारल्यास अशा उपक्रमांवर परिणाम होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
याशिवाय, नवभारत विद्यालय, नवभारत कन्या विद्यालय, नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कर्मवीर महाविद्यालय तसेच पंचायत राज प्रशिक्षण केंद्र या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था मालधक्क्याच्या परिसरात असल्याने त्यांच्यावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित मालधक्का हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत असून, या परिसरात वाघ, अस्वल, बिबट यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर आहे.
मूल शहरातून सुरजागड येथील लोहखनिज वाहतुकीसाठी प्रस्तावित रेल्वे मालधक्का तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी मूल शहर बचाव संघर्ष समितीने केली आहे. अन्यथा, विविध स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
या पत्रकार परिषदेला उद्योजक जीवन कोंतमवार, विजय सिद्धावार, नरेश गोयल, नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, एड. प्रणव वैरागडे, अनिल मोगरे, एड. अश्विन पॉलीकर, संजय पडोळे, प्रा. प्रशांत वासाडे आदी समितीचे पदाधिकारी, सदस्य, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुल येथील विविध संघटनांनी माल धक्का होऊ नये याकरिता संघर्ष समितीला समर्थन करावे असे आवाहन करण्यात आले.
या पत्रपरिषद प्रसंगी मोबाईल वरून बोलतांना नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी मूल मध्ये मालधक्का होऊ नये यासाठी नगरपरिषदेचा ठराव घेतला जाईल, हे सांगताना यासाठी होणाऱ्या आंदोलनात पूर्णपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!