Friday, August 21, 2026
Homeकिसान शास्त्रज्ञ मंच बैठककृषि महाविद्यालय मुल तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक चितेगांव येथे संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि महाविद्यालय मुल तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक चितेगांव येथे संपन्न

image_pdfimage_print

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

     कृषि महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक १५ जुलै, २०२६, बुधवार रोजी सायंकाळी ६.०० वाजता  मूल तालुक्यातील मौजा चितेगाव येथे कृषि महाविद्यालय, मुल येथील सहयोगी अधिष्ठाता, डॉ. विलास अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी विविध विषयाचे विषयतज्ञ तसेच चितेगाव येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मुख्यतेने “ हवामान बदलाशी जुळवून घेत धान पिकांचे नियोजन आणि बांधावर फणस-शेवग्याची लागवड” या विषयावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी कृषि महाविद्यालया चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे, यांनी जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे धान रोपवाटिकेतील ओलावा टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा काटकसरीने वापर करून आवश्यकतेनुसार हलके सिंचन द्यावे, जेणेकरून रोपे कोमेजणार नाहीत. तसेच, रोपवाटिकेत भेगा पडू देऊ नयेत आणि मातीतील आवश्यक ओलावा कायम राखावा. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन करून निरोगी रोपे तयार ठेवणे हे यशस्वी धान लागवडीसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गांडूळखत व गांडूळअर्काच्या वापराबाबतही मार्गदर्शन केले. धानाच्या रोपवाटिकेत तसेच मुख्य शेतात शेणखत, पालापाचोळा व इतर सेंद्रिय अवशेषांपासून तयार केलेले गांडूळखत वापरल्यास रोपे निरोगी राहतात, जमिनीची सुपीकता वाढते, उत्पादनात भर पडते आणि रासायनिक खतांचा वापर कमी करता येतो, असे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संबधित विविध विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
उद्यान विद्या विभागाचे प्रा.डॉ. रमाकांत गजभिये, यांनी शेताच्या बांधावर फणस व शेवग्याची लागवड करून अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, फणसाची लागवड दीर्घकालीन उत्पन्न मिळवून देण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठीही उपयुक्त ठरते. तसेच, शेवगा हे कमी पाण्यात वाढणारे, पौष्टिक आणि वर्षभर बाजारपेठेत मागणी असलेले पीक असल्याने त्यापासून नियमित उत्पन्न मिळू शकते. शेतीसोबतच अतिरिक्त आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी बांधावर फळझाडांची लागवड हा प्रभावी पर्याय असून, त्यातून शेतकऱ्यांना विविध शेतीखर्च भागविण्यास मदत होऊ शकते. एखाद्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे उदा. अतिशय कमी पाऊसमान, अतिवृष्टी, रोग व किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव इ. झाल्यास हातात आलेले धान पिकापासून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नाही अश्या वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर पाच ते दहा फणस, शेवगा, जांभूळ, सिताफळ किंवा पेरू इ. कोरडवाहू फळझाडे असल्यास शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करता येते असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, फणस व शेवग्याची लागवड तुलनेने कमी खर्चात आणि कमी व्यवस्थापनात करता येते. तसेच शेताच्या बांधावरील झाडांमुळे मृदा व जलसंधारणास चालना मिळते, शेतातील जैवविविधता वाढते आणि शेतीची पर्यावरणीय शाश्वतता मजबूत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री. देवानंद कुसुंबे, कृषिविद्या विषयतज्ञ यांनी धानाच्या रोपांची चांगली वाढ व निरोगी विकास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यकतेनुसार संतुलित खतांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशींनुसार पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजना अवलंबाव्यात. वाणानुसार रोपांचे वय साधारणपणे २१ ते २५ दिवस झाल्यानंतर पुरेशी ओल असलेल्या मुख्य शेतात रोपांची पुनर्लागवड (रोवणी) करावी. जर पावसाला विलंब होत असेल आणि रोपांचे वय वाढत असेल, तर उपलब्ध सिंचन सुविधेचा वापर करून मुख्य शेतात लागवडीचे नियोजन करावे. निरोगी व जोमदार रोपवाटिका ही अधिक उत्पादनक्षम धान पिकासाठी भक्कम पाया ठरते. तसेच योग्य रोपवाटिका व्यवस्थापन, शिफारशीनुसार लागवडीचे अंतर, प्रभावी पाणी व्यवस्थापन आणि संतुलित खत व्यवस्थापन या बाबींविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. भूषण ठाकरे, कृषि किटकशास्त्र विषयतज्ञ यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून पिकांवरील किडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काची फवारणी करण्याचे आवाहन केले. त्यांनी कापूस व धान पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) प्रभावीपणे राबविण्याबरोबरच ट्रायकोकार्ड आणि विविध जैविक घटकांचा वापर करून किडींचे नियंत्रण करण्यावर भर दिला. हवामान बदलामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करावी, किडींची लक्षणे वेळेत ओळखून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. प्रविणा बरडे, वनस्पतीरोगशास्त्र विषयतज्ञ यांनी कमी पावसाच्या परिस्थितीत ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचे महत्त्व शेतकऱ्यांना सविस्तरपणे पटवून दिले. ट्रायकोडर्माच्या वापरामुळे पिकांमध्ये रोगकारक बुरशीविरुद्ध नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता विकसित होण्यास मदत होते, तसेच मुळांची वाढ सुधारून पिकांची जोमदार वाढ व ताण सहन करण्याची क्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी जैविक खते व जैविक बुरशीनाशकांचा वापर वाढविण्याचे आवाहन करत शेतकऱ्यांना त्याचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित केले.
उपरोक्त शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले शेतकरी बांधव गेल्या ८-१० दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील धान रोपवाटिका कशी वाचवावी यामुळे चिंतातूर दिसून आले. त्याचबरोबर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील धान रोपवाटिकाचे नुकसान झाल्यास व दुबार पेरणीची संकट उद्भवल्यास शासनाने शेतकऱ्यांना धान बियाणे उपलब्ध करून देण्याबाबतची अपेक्षा व्यक्त केली.
सदर कार्यक्रमास एकुण ३० शेतकरी व ६ शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देवानंद कुसुंबे व उपस्थितांचे आभार कु.ज्योती कांबळे यांनी मानले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!