Saturday, August 22, 2026
Homeनिवडनिष्ठा,अनुभव आणि विश्वासाचा सन्मान:राकेश रत्नावार यांची मूल नगरपरिषद उपाध्यक्षपदी पाचव्यांदा निवड
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

निष्ठा,अनुभव आणि विश्वासाचा सन्मान:राकेश रत्नावार यांची मूल नगरपरिषद उपाध्यक्षपदी पाचव्यांदा निवड

image_pdfimage_print

गुलाब खान पठाण व बंडू गुरनूले यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड

मूल

मूल नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत २० पैकी तब्बल १८ जागांवर दणदणीत यश संपादन केले. या निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह भाजपला मोठा पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. काँग्रेसच्या नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी २०८१ मतांच्या फरकाने भव्य विजय मिळवला.

प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आलेल्या या निवडणुकीमुळे अनेक वर्षांनंतर मूल नगरपरिषदेवर काँग्रेसचे पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. ५ जानेवारी रोजी नगराध्यक्षांसह १८ नगरसेवकांनी अधिकृतपणे पदग्रहण केले.

आज पार पडलेल्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेत काँग्रेसचे ज्येष्ठ व अनुभवी नेते राकेश रत्नावार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच गुलाब खान पठाण व बंडू गुरनूले यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

गुलाब खान पठाण, उपाध्यक्ष राकेश भाऊ रत्नावार आणि बंडूभाऊ गुरनुले

राकेश रत्नावार हे प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. जिल्हा कार्यकारिणीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार क्षेत्र आणि नगरपरिषद अशा विविध स्तरांवर त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. नगरपरिषदेच्या कामकाजाची सखोल जाण व प्रशासकीय अनुभवामुळे आगामी पाच वर्षांत मूल शहराचा कारभार अधिक सक्षम, पारदर्शक व विकासाभिमुख पद्धतीने चालविण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

युवा नेतृत्व राकेश रत्नावार यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास

पदावर असो वा नसो, वर्षभर जनतेच्या सेवेत झटणारे, गरिबांच्या आरोग्यासाठी धावून जाणारे, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात सतत कार्यरत असलेले राकेशभाऊ रत्नावार हे एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले नेतृत्व आहे. लहानपणापासूनच त्यांच्यात उपजत नेतृत्वगुण दिसून आले. गरीबीची जाणीव असून लोकसेवेसोबतच रुग्णसेवेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बहुजन समाजातील युवा नेतृत्व म्हणून समाज त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे.

पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या राकेशभाऊंनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. त्याच वयात मूल नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून ते प्रथमच निवडून आले. अत्यंत कमी वयात नगरसेवक होणारे नेतृत्व म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. सदस्यपदाच्या कार्यकाळात चाणक्य नीतीचा वापर करत सलग पाच वर्षे नगरपरिषदेचे बांधकाम सभापतीपद त्यांनी यशस्वीरीत्या भूषवले.

संतोषसिंह रावत यांना बंधूस्थानी मानत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातून ते दुसऱ्यांदा विजयी झाले व अडीच वर्षे नगरपरिषद उपाध्यक्षपदी कार्यरत राहिले. त्यानंतर तिसऱ्यांदाही नगरपरिषदेत निवडून येत पुन्हा उपाध्यक्षपद मिळवले. विशेष म्हणजे स्वतःचा वॉर्ड व प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागातून निवडून येत इतर सहकाऱ्यांनाही निवडून आणण्याची राजकीय किमया त्यांनी साध्य केली आहे.

काँग्रेस नेते, माजी विरोधी पक्ष नेते व विधानसभेचे गटनेते मान. विजय वडेट्टीवार, खासदार मान. प्रतिभाताई धानोरकर तसेच प्रदेश काँग्रेसचे महासचिव संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात मूल नगरपरिषद स्पष्ट बहुमतात आल्यानंतर राकेश रत्नावार यांची पुन्हा गटनेतेपदी निवड होऊन जिल्ह्यात पाचव्यांदा उपाध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे.

सहकार व समाजसेवेतही भक्कम योगदान

राजकीय क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रातही राकेशभाऊ आघाडीवर आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्यानंतर सलग १० वर्षांपासून ते बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. विविध कार्यकारी सहकारी संस्था व आदर्श शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे संचालक म्हणूनही ते सक्रिय आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य भाव, मोफत निवास व्यवस्था, ऑनलाईन नोंदणी, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना तालुक्यातील शेकडो निराधार, वृद्ध, गरीब व गरजू लाभार्थ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

जनतेशी असलेली नाळ, सततची कार्यतत्परता व निष्ठावान नेतृत्वामुळे राकेश रत्नावार आजही सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. त्यांच्या उपाध्यक्षपदी निवडीमुळे मूल नगरपरिषदेत स्थिर, सक्षम व विकासाभिमुख प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!