मुल,( प्रा. चंद्रकांत मनियार )
कृषि महाविद्यालय, मुल येथील प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने “एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी” या विषयावर मार्गदर्शनपर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मूल येथील तहसीलदार श्रीमती मृदुला मोरे उपस्थित होत्या. कृषि महाविद्यालय, मुलचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तसेच उद्यान विद्या विभागाचे प्रा. डॉ. आर. पी. गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नागेश नवघरे , सहाय्यक प्राध्यापक, मृदा विज्ञान विभाग यांनी केले.
तहसीलदार मृदुला मोरे, यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेची संपूर्ण माहिती देत परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, संदर्भग्रंथांची निवड, चालू घडामोडींचे महत्त्व तसेच मुलाखतीपर्यंतचा प्रवास याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नसल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये यांनी आपल्या मनोगतात प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना अभ्यासाची पद्धत, चालू घडामोडींचा सतत अवलोकन व विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय सेवांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर न थांबता स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत प्रवेश करून समाजसेवेसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले. त्यांनी बोलताना सांगितले कि, जीवनाची गुणवत्ता ही तुम्ही स्वतःला विचारत असलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेवर ठरते व त्यातून येणाऱ्या अडचणींवर तुम्ही नवे मार्ग शोधू शकता. अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला निश्चितच दिशा मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. गितांशु डिंकवार यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक, मृदा विज्ञान विभाग यांनी केले.
सदर व्याख्यानाला बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी तृतीय, पाचवा व सातवा सत्रातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरला.




