Wednesday, October 21, 2026
Homeकृषि दिवसकृषि सप्ताहा च्या पाचव्या दिवशी कृषि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि सप्ताहा च्या पाचव्या दिवशी कृषि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

image_pdfimage_print

मुल  ( प्रा. चंद्रकांत मनियार )

       डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू मान. शरदराव गडाख यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याबाबत  केलेल्या सूचनेनुसार कृषि सप्ताहाचे औचित्य साधून मूल येथील कृषि महाविद्यालय, यांच्या वतीने शिंदेवाही तालुक्यातील ग्राम. लोनवाही येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली “शेतकऱ्यांच्या बांधावर कृषिशास्त्रज्ञ” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन खरीप हंगामातील धान पिकाच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शेतातील परिस्थितीची पाहणी करून समस्यांनुसार उपाययोजना सुचविण्यात आल्या. सदर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि महाविद्यालय, मुल येथील श्री. एस. पी. पतिंगे, सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र), डॉ. बी. ए. ठाकरे (किटाकशास्त्र), डॉ. स्वप्नील ठाकरे (कृषिविद्या) आणि श्री. अजय उईके (कृषि विस्तार शिक्षण) यांनी विविध पद्धतीने धान पिकाची लागवड करण्यापूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच चर्चा करण्यात आली. धान पिकाच्या बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यासाठी ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी यांसारख्या जैविक घटकांचा वापर करावा असे सांगितले, तसेच धान पिकाची खरीप व उन्हाळी हंगामात लागवड करत असल्यामुळे खरीप हंगामातील कीड व रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. सध्याच्या हवामान बदलाच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड करण्यासाठी लवकर व मध्यम कालावधीत परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी तसेच विविध लागवड पद्धतीच्या वापर करावा. जसे की पेरीव पद्धत, रोवणी पद्धत व फेकीव पद्धतीच्या वापर करावा असे सुचविले. रोवणी पद्धतीच्या अवलंब करताना पिकेव्ही ‘श्री’ पद्धतिचा अवलंब करावा असे सांगण्यात आले, यामध्ये ५ किलो बियाणे प्रती हेक्टरी घ्यावे व ८ ते १५ दिवसाचे रोपे लागवडीकरिता घेण्यात यावे, त्यानंतर रोवणी करतांनी लवकर येणाऱ्या धान जातींची २०x२० सें.मी. अंतरावर, तसेच मध्यम व उशिरा कालावधीच्या वाणांची २५x२५ सें.मी. अंतरावर प्रति चुड एक रोप लावून लागवड करावी असे सांगण्यात आले. या पद्धतीच्या वापरामुळे बियाण्याची बचत होते. प्रचलित पद्धतीपेक्षा शाश्वत व २० ते ३० टक्के अधिक उत्पादन मिळते असे सांगण्यात आले.
धान पिकातिल खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, तपकिरी तुडतुडे यांसारख्या प्रमुख किडींची ओळख, त्यांचे आर्थिक नुकसानीचे स्तर, तसेच करपा, कडा करपा, यांसारख्या रोगांची लक्षणे ओळखून वेळेत नियंत्रण करण्याकरिता “कीड व रोगांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन” करण्याबाबत माहिती देण्यात आली. पेरीव धान पिकामध्ये सुरुवातीच्या कालावधीत ३० ते ४५ दिवसात तणांचा प्रादुर्भावाचा उत्पादनावर परिणाम होते. त्यामुळे तणांचे वेळेवर नियंत्रण करण्यासाठी शिफारशीनुसार निवडक तणनाशके, फवारणीची योग्य वेळ, पाण्याचे व्यवस्थापन आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शास्त्रज्ञांनी सखोल माहिती दिली. याशिवाय तणनाशकांचा अतिरेक टाळून “एकात्मिक तण व्यवस्थापन” करण्याचे सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील विविध अडचणी व शंकांचे निरसन करून घेतले. संतुलित खतांचा वापर करताना रासायनिक खतांबरोबर जैविक घटक, हिरवळीचे खतांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी कृषि शास्त्रज्ञांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन, शेतातील पाण्याचा निचरा, तसेच पिकाची नियमित पाहणी करण्याचे महत्त्व सांगितले. शास्त्रज्ञांनी प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या परिस्थितीनुसार तांत्रिक सल्ला दिला. शास्त्रज्ञांनी सांगिलेल्या आधुनिक कृषितंत्रज्ञान, शास्त्रोक्त पीक व्यवस्थापन आणि संशोधनाधारित शिफारशी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्यामुळे येत्या खरीप धान उत्पादन खर्चात बचत तसेच उत्पादनात वाढ होईल आणि गुणवत्तापूर्ण धान उत्पादन साध्य करण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिति सुधारेल असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!