मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
कृषि महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची 43 वी बैठक दिनांक १८ ऑगस्ट, २०२६, रोजी मौजा आदर्शखेडा (मारोडा) ता. मुल येथील प्रगतशील शेतकरी श्री. प्रशांत मेश्राम यांच्या शेतावर कृषि महाविद्यालय, मुल येथील सहयोगी अधिष्ठाता, डॉ. विलास अतकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या प्रसंगी विविध विषयाचे विषयतज्ञ तसेच आदर्शखेडा (मारोडा) येथील शेतकरी बांधव उपस्थित होते. कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन “एकात्मिक शेती पद्धतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग” याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि महाविद्यालयाचे डॉ. प्रवीण घुबे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), डॉ. अमरदीप डेरे (कृषि अभियांत्रिकी), श्री. देवानंद कुसुंबे (कृषिविद्या), श्री. अजय उईके (कृषि विस्तार शिक्षण), डॉ. प्रविणा बरडे (वनस्पती रोगशास्त्र) आणि कु. ज्योती कांबळे (उद्यानविद्या) यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीतील जोखीम कमी करून शेतकऱ्यांना वर्षभर शाश्वत व नियमित उत्पन्न मिळवून देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. तसेच विविध पिके व पूरक व्यवसायांची प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन केले. यावेळी कापूस, भाजीपाला तसेच मल्चिंगवर घेतलेल्या वांगी व टमाटरच्या पिकाची पाहणी करण्यात आली. वांग्यामध्ये कलम (ग्राफ्टिंग) तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मुळकूज व मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन झाडांची वाढ जोमदार होते, उत्पादनात वाढ होते, तसेच पिकाचे आयुष्य वाढते, असे सांगण्यात आले.

एकात्मिक शेतीमध्ये पिक उत्पादनासोबतच दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, फळबाग, भाजीपाला, गांडूळखत व सेंद्रिय निविष्ठा निर्मिती यांसारख्या पूरक व्यवसायांचा समावेश करता येतो. एका घटकातून निर्माण होणाऱ्या अवशेषांचा दुसऱ्या घटकासाठी उपयोग केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करता येतो. यावेळी नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृत, बीजामृत, आच्छादन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर व रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कृषि शास्त्रज्ञांनी शेताच्या बांधावर लागवड केलेल्या निलगिरीच्या झाडांची पाहणी करून त्याचा संरक्षक पट्टा (Shelterbelt) म्हणून होणारा उपयोग स्पष्ट केला. शेताच्या कडेला योग्य अंतरावर निलगिरीची लागवड केल्यास वाऱ्याचा वेग कमी होऊन पिकांचे संरक्षण, मातीची धूप कमी होणे तसेच शेतातील सूक्ष्म वातावरण सुधारण्यास मदत होते, परंतु निलगिरीची पाण्याची गरज जास्त असल्याने झाडांची वाढ अनियंत्रित होऊ न देता वेळोवेळी छाटणी करून शेतातील पिकांशी पाणी व पोषकद्रव्यांसाठी होणारी स्पर्धा कमी करावी” असे सुचविण्यात आले. तसेच शेततळ्याच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचे संकलन, संरक्षित सिंचन व वर्षभर पाण्याची उपलब्धता याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी श्री. प्रशांत मेश्राम हे या शेततळ्यामध्ये मत्स्यपालन (रोहू, कतला व मृगळ प्रजाती) सुद्धा करत असल्याने त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. उपस्थित शेतकऱ्यांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायातील गीर, साहीवाल व जर्सी गोवंशाच्या संगोपनातून मिळणारे आर्थिक फायदे, संतुलित आहार व आरोग्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व प्रश्न मांडल्यानंतर शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेताची पाहणी करून एकात्मिक शेती व्यवस्थापन व आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देवानंद कुसुंबे व उपस्थितांचे आभार श्री.अजय उईके यांनी केले.




