Friday, June 5, 2026
Homeनिवेदनमूल तालुक्यातील चिचाळा गावासाठी वाढीव पाणीटाकी व प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत केली मागणी

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल तालुक्यातील चिचाळा गावासाठी वाढीव पाणीटाकी व प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत केली मागणी

आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गट्टुवार यांचे निवेदन

मूल ( मेहुल मनियार ) :

       आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल तालुक्यातील चिचाळा गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाई व आरोग्य सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गट्टुवार यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चिचाळा गावाची लोकसंख्या ५ हजारांपेक्षा अधिक असून अस्तित्वातील पाणीटाकी गावाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यात अपुरी पडत आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जलजीवन अभियानांतर्गत चिचाळा येथे नवीन वाढीव पाणीटाकी मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने अधिकृत ठरावही मंजूर केला आहे.

यासोबतच चिचाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचीही जोरदार मागणी करण्यात आली आहे. सध्या गावात केवळ उपकेंद्र असून ते मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न आहे. चिचाळा ते मारोडा हे सुमारे १० किलोमीटर अंतर असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच हळदी, ताडाळा, कवडपेठ, दहेगाव, भेजगाव, मानकापूर, भंजाळी, सिंतळा आदी अनेक गावांचा भारही या उपकेंद्रावर असल्याने आरोग्य सेवा अपुऱ्या पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चिचाळा येथे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना वेळेवर उपचार सुविधा उपलब्ध होतील व ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, गावाच्या मूलभूत गरजांशी संबंधित या दोन्ही मागण्यांना प्राधान्य देऊन शासन स्तरावर आवश्यक निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा प्रशांत गट्टूवार ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!