मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मुल येथील कृषी महाविद्यालयात योग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वि. जी. अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून योग प्रशिक्षक प्रा. राम गावंडे नागपूर,डॉ. आर. पी. गजभिये व प्रा. चंद्रकांत मनियार यांची उपस्थिती लाभली.
योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस योगाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो.
प्रा. गावंडे यांनी सांगितले की,योगामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, शरीर लवचिक, मजबूत आणि तंदुरुस्त राहते,
मानसिक शांतता मिळते, ताणतणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यास योग मदत करतो. तसेंच नियमित योगाभ्यासामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. योग लोकांना संतुलित आणि आरोग्यदायी जीवन जगण्यास प्रेरित करतो.
प्रा. चंद्रकांत मणियार यांनी योग आणि प्राणायाम मुळे मिळालेला शारीरिक फायदा याबाबत आपले अनुभव सांगितले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतकरे यांनी सुद्धा योग आणि प्राणायाम चे जीवनात महत्त्व काय आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.अतकरे यांनी योग प्रशिक्षक प्रा. राम गावंडे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार केला.
जागतिक एकता आणि शांततेचा संदेश – योग हा मानवतेला जोडणारा मार्ग असून जगभरातील लोकांना एकत्र आणतो.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे योगासना चे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,आणि विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे प्रा. गावंडे यांनी उत्तर देऊन समाधान केले
या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ .प्रा. आशिष लाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. नागेश नवघरे यांनी मांडले


