Sunday, June 21, 2026
Homeशेतकरी शास्त्रज्ञ मंचकृषि महाविद्यालय मुल तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची त्रेचाळीसावी बैठक संपन्न

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि महाविद्यालय मुल तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची त्रेचाळीसावी बैठक संपन्न

मुल  ( प्रा. चंद्रकांत मनियार )

       पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय मुल तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची त्रेचाळीसावी बैठक दिनांक १७ जून, २०२६, बुधवार रोजी मुल तालुक्यातील  मौजा सिंतळा येथे कृषि महाविद्यालय, मुल येथील सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे  यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. रमाकांत पी. गजभिये, विविध विषयतज्ञ तसेच सिंतळा येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मुख्यतेने “ सध्यस्थितीतील हवामानानुकूल शेतीचे व्यवस्थापन ; खरीप धान व भाजीपाला लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान” या विषयावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी मुल येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, यांनी सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी पिकांची निवड, बियाणे प्रक्रिया व लागवड तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेती करावी. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतरच पेरणी/लागवड करावी. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज, जमिनीची स्थिती आणि बाजारपेठ लक्षात घेऊन पीक नियोजन करण्याचे आवाहन केले. तसेच उन्हाची तीव्रता वाढल्यास कुकुटपालनगृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या भांड्याची संख्या वाढवावी. थंड, स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी आणि खाद्य सकाळी किंवा संध्याकाळीच्या वेळेस द्यावे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संबधित विविध विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
श्री. देवानंद कुसुंबे, कृषिविद्या विषयतज्ञ  यांनी धान लागवडीमध्ये उत्पादन वाढीसाठी पीकेव्ही एचएमटी, पीडीकेव्ही तिलक, पीडीकेव्ही साक्षी यांसारख्या सुधारित वाणांची निवड, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, दर्जेदार बियाणे, योग्य रोपवाटिका व्यवस्थापन, योग्य लागवड अंतर, पाणी व्यवस्थापन व संतुलित खत व्यवस्थापन, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  वनस्पती रोगशास्त्र विषय तज्ञ डॉ. गीतांशु डिंकवार यांनी धान पिकातील भविष्यात येणाऱ्या मर, मुळकुज, करपा, कडाकरपा, काणी इ. रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी बीज प्रक्रियेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले. पेरणीपूर्वी चांगल्या दर्जाचे प्रमाणित बियाणे निवडून उगवण चाचणी करावी. शिफारशीनुसार बुरशीनाशक व जैविक घटकांची प्रक्रिया केल्यास रोपांची संख्या व गुणवत्ता सुधारते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान लागवडीपूर्वी बीज प्रक्रियेला प्राधान्य द्यावे, असे सांगितले. त्यामध्ये रायझोबीयम, अ‍ॅझोटोबॅक्टर, बॅसिलस, स्यूडोमोनास, व ट्रायकोडर्मा इ. वापरण्यास सांगितले तसेच रासायनिक खते व जैविक खते एकत्र मिसळू नये असे आवाहन केले. रसायनांच्या अतिवापराने सूक्ष्मजिवांवर व पिकांवर काय परिणाम होतो यावर मार्गदर्शन केले. कृषी कीटकशास्त्र विषय तज्ञ डॉ. भूषण ठाकरे, यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून पिकांवरील किडींचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन केले. निंबोळी गोळा करून उन्हात वाळवून त्यापासून निंबोळी अर्क तयार करावा कारण निंबोळी अर्कामधील अझाडिरॅक्टिन घटकामुळे रसशोषक किडींवर प्रतिबंधात्मक परिणाम होतो. दशपर्णी अर्कामध्ये विविध वनस्पतींच्या पानांचा अर्क असल्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, अळीवर्गीय किडी यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते असे सांगितले.
सदर कार्यक्रमास एकुण २६ शेतकरी व ७ शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्री. देवानंद कुसुंबे यांनी मानले.

 

 

 

 

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!