Wednesday, October 21, 2026
Homeनशा मुक्त भारत अभियानमूल येथील कर्मवीर महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कर्मवीर महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ

image_pdfimage_print

मूल : ( मेहुल मनियार )

       शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथील राष्ट्रीय सेवा योजना +2 विभागाच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर आणि स्वीकार व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘नशामुक्त भारत अभियान – विकसित भारत की पहचान’ या उपक्रमांतर्गत व्यसनमुक्तीविषयक व्यापक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथील समुपदेशक श्री. अतुल शेंद्रे उपस्थित होते. तसेच स्वीकार व्यसनमुक्ती केंद्र, दुर्गापूर, चंद्रपूरचे संचालक श्री. तुलसीदास शहारे, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, मूल येथील समुपदेशक ममता शेंडे आणि श्री. राहुल जिरकुंटवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमा दरम्यान श्री. अतुल शेंद्रे यांनी विविध प्रात्यक्षिके व प्रयोगांच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, तसेच कुटुंब आणि समाजावर निर्माण होणारे नकारात्मक परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी योग्य निर्णयक्षमता, आत्मसंयम आणि सकारात्मक विचारसरणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्यसनाधीन व्यक्तींना दोष देण्याऐवजी त्यांना समुपदेशन व योग्य उपचारांच्या माध्यमातून व्यसनमुक्त होण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. तुलसीदास शहारे यांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहावे आणि आपल्या मित्रपरिवारात, कुटुंबात तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. या शपथेद्वारे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि समाजात व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक ज्ञानासोबतच सामाजिक जाणीव, आरोग्यविषयक जागरूकता आणि नैतिक मूल्ये जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. व्यसनमुक्त युवक ही सुदृढ कुटुंबाची आणि सक्षम राष्ट्राची ओळख असून, तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता आपल्या शिक्षणाकडे, करिअरकडे आणि उज्ज्वल भविष्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +2 विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल बोधे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल शेलेकर यांनी केले.

या जनजागृती कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करणे, व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी तरुणांचा सहभाग वाढविणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!