मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
कृषी महाविद्यालय, मूल च्या कृषि कन्यांद्वारे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत शिंदेवाही तालुक्यातील लोनवाही या गावात बीज उगवण क्षमता चाचणी विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे महत्त्व पटवून देणे तसेच दर्जेदार बियाण्यांची निवड करून पीक उत्पादनात वाढ करण्याबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, कृषी विज्ञान केंद्र, शिंदेवाही येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे, रावे प्रभारी डॉ. देशपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे तसेच कृषिशास्त्र (Agronomy) विषयतज्ज्ञ डॉ. कुसुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE ) च्या विद्यार्थीनी कु.करुणा साहू, कु.महारुख शेख, कु. मोहिनी तिखट, कु.पल्लवी उरकुडे आणि कु.श्रद्धा वालोडे यांनी शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता चाचणीचे महत्त्व, उद्देश आणि पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे बियाण्यांची उगवण टक्केवारी कशी तपासावी तसेच पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी केल्यास योग्य व दर्जेदार बियाण्यांची निवड कशी करता येते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच कमी उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांच्या वापरामुळे होणारे उत्पादनातील नुकसान, असमान उगवण आणि त्याचा पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी प्रमाणित व गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा वापर करावा तसेच पेरणीपूर्वी बीज उगवण क्षमता चाचणी करावी, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
