मूल ( मेहुल मनियार )
नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणीत गुरुकुंज आश्रम मोझरी द्वारा आयोजित ‘ग्रामगीता जीवन विकास परीक्षा’ चा प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, श्रमप्रतिष्ठा आणि राष्ट्रसंतांचे विचार रुजविण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक छत्रपती बारसागडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी आणि मार्गदर्शक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि सामूहिक प्रार्थनेने झाली. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक श्री बारसागडे सर सांगितले की, “आजच्या आधुनिक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, सुसंस्कारित जीवन जगण्यासाठी ग्रामगीतेतील विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आत्मसात केलेले विचार स्वतःच्या जीवनात अंगीकारून आदर्श नागरिक बनावे.”
या परीक्षेत विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह यश संपादन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी परीक्षार्थींना अधिकृत प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. प्रमाणपत्र हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व आत्मविश्वास ओसंडून वाहत होता.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक श्री.गुरुदास चौधरी, कु.प्रतिमा उमक, राजू बोढे, विजय निखारे, उदयचंद चौधरी, कु. दिपा गोंगल, कु. माधुरी तलांडे, परीक्षा प्रमुख आणि शिक्षकेतर कर्मचारी राहुल नागापुरे, मनीषा मडावी, संगीता टांगले यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन निलेश माथनकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्याला विद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.




